पुणे : सिंहगडाच्या पायथ्याशी गोळेवाडी येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करत मोठ्या प्रमाणात मद्य, गुटखा व सिगारेटची पाकिटे जप्त करुन नष्ट करण्यात आली. वन विभाग व राजे शिवराय प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संयुक्तपणे ‘सिंहगड रक्षण मोहिम’ राबवण्यात आली हाेती. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
ज्या उपद्रवी पर्यटकांकडे मद्याच्या बाटल्या सापडल्या त्यांच्यावर वन विभागाकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तपासणी सुरू असलेली पाहून कारवाईच्या भीतीने अनेक पर्यटक परत फिरताना दिसत होते.
दरवर्षी नव वर्षाच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक पर्यटक सिंहगडावर येतात. मद्य, गुटखा, सिगारेट किंवा इतर नशेचे पदार्थ गडावर सोबत नेण्यास वन विभागाची बंदी आहे. असे असतानाही हे पर्यटक या वस्तू नेताना सापडले. विविध सामाजिक संस्था व वन विभागाच्या वतीने सातत्याने याबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात. हे लक्षात घेऊन ही माेहीम आखण्यात आली हाेती.






