Photo Credit- Social Media
इंदापूर: “आमचे छोटे-मोठे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मी निवडणूक लढवण्याची इ्च्छा आहे. निवडणूक लढवण्याबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. पण महायुतीतील जे विद्यमान सदस्य त्या ठिकाणी आहेत त्याठिकाणी तेच निवडणूक लढवतील, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर दोन दिवासांपूर्वी शरद पवार यांनी मला सिल्व्हर ओकवर भेटायला बोलवले. त्यावेळी तिथे खासदार सुप्रिया सुळेही होत्या, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्याची परवानगी दिली.” अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. ते इंदापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या सर्व चर्चांना त्यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. इंदापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानतंर हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. पण पक्षप्रवेशाची तारीख स्वत: शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे ठरवतील, असही त्यांनी सांगितले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित असला तरी त्यांच्या प्रवेशाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
हेही वाचा: आदिवासी आमदार आक्रमक, मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर मारल्या उड्या, नेमकं काय आहे कारण?
हर्षवर्धन पाटील म्हणाले, शरद पवार मला म्हणाले मी सगळ्या इंदापूरचा कानोसा घेतला आहे. तुम्ही आमच्या राष्ट्रवादीत यावं, सुप्रिया ताईंनीही होकार दिला. त्यानंतर मला इंदापूरला जाऊन माझी भूमिका सांगावी लागेल असेल त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांना विचारल्यावर आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावे, अशी सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मी घोषित करतो की, मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी असे आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेत आहोत.
हा निर्णय माझ्या एकट्याचा निर्णय नाही. भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यासोबत आम्ही काम केलं आहे. त्यात रावसाहेब दानवे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर काही नेत्यांशीही बोललो.त्यांनाही यासंदर्भात कल्पना दिली आहे. म्हणून आम्ही आज हा निर्णय घेत आहोत. इंदापूरमध्ये जनतेची भूमिका महत्त्वाची आहे. गेल्या 10 वर्षात जी माणसे आमच्या मागे ठामपणे उभी राहिली. पण त्यांना खूप त्रास झाला. गावागावात विकासकामाऐवजी अन्याय झाला. हा जनतेचा उद्रेक या भागात झाला आहेत.
हेही वाचा: पुणे हादरलं! पोटच्या पोरीवर नराधम बापाकडून अत्याचार; धक्कादायक प्रकार उघडकीस
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी गुरूवारी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानी त्यांची भेट घेतली. जवळपास एक तास चर्चा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र आणि कन्या अंकिता पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सअपच्या डिपीला तुतारी चिन्ह असलेला फोटो ठेवला. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानतंर हर्षवर्धन पाटील यांनी आपण पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करू, असं सांगितलं होतं.