संग्रहित फोटो
आपल्या शोकसंदेशात हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विज्ञान शाखेत पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूरचे नगराध्यक्ष म्हणून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. त्यानंतर लातूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १९८० साली लातूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेल्या पाटील चाकूरकर यांनी सलग सात निवडणुकांत मतदारांचा विश्वास संपादन केला.
इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्रालयासह विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत दक्षता, शिस्त आणि प्रामाणिकपणाने सांभाळल्या. पुढे लोकसभा अध्यक्ष आणि पंजाबचे राज्यपाल म्हणून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात मोलाचे योगदान दिले. पाच दशकांहून अधिक काळाच्या आपल्या सार्वजनिक जीवनात लातूरसह महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदीय कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नव्या संसद ग्रंथालय इमारतीला गती देणे, अशा अनेक उपक्रमांत त्यांच्या दूरदृष्टीचा आणि प्रशासन कौशल्याचा प्रत्यय आला.
दांडगा जनसंपर्क, साधेपणा, शिस्त, तत्त्वनिष्ठा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनाने लातूरची व काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सामील असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.






