राज्यात उष्णतेची लाट (फोटो- ai gemini)
पुण्यात तापमान ३७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
जून महिन्याचा पंधरवडा पूर्ण कोरडा
१९५८ नंतर प्रथमच पुण्यात पावसाची शून्य नोंद
पुणे: राज्यात पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार असून काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तर विदर्भातील तुरळक भागांत पुढील काही दिवस हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह सरींची शक्यता आहे. संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दिवसाचे वातावरण उष्ण व दमट राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाच्या सरी पडू शकतात. १६ ते १८ जूनदरम्यान वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच १८ व १९ जून रोजी धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यांमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांना पावसाची अद्याप प्रतीक्षाच; कमी पावसामुळे चिंतेचे ढग कायम
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा संध्याकाळी वातावरण अंशतः ढगाळ होऊ शकते. मंगळवारी (ता.१६) शहरातील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बुधवारी (ता.१७) तापमानात आणखी किंचित वाढ होऊन कमाल तापमान ३७ अंश आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
यंदा जूनच्या सुरुवातीला लोहेगाव आणि हडपसर परिसरात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी शहरातील बहुतांश भागात मान्सूनचा प्रभाव दिसून आलेला नाही. गेल्या दहा वर्षांतील सर्वात कोरडा मान्सून अनुभवण्याची शक्यता निर्माण झाली असून, मान्सूनचा प्रवाह अद्याप पुरेसा बळकट नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शहरातील कमाल तापमान सुमारे ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर असून किमान तापमान २५ ते २६.५ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. पाषाण येथे सोमवारी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवेत आर्द्रता वाढलेली नसणे आणि मान्सूनशी संबंधित जोरदार वाऱ्यांचा अभाव यामुळे तापमानात फारसा बदल होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Maharashtra Rain Alert: जूनमध्येही उन्हाचा चटका! पावसाच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष, ‘या’ ठिकाणी…
यंदाच्या कमकुवत मान्सूनमागे ‘एल निनो’ हे प्रमुख कारण मानले जात आहे. प्रशांत महासागरातील ही हवामान घटना जगभरातील हवामानावर परिणाम करत असून भारतातील पावसावरही त्याचा परिणाम होत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस पुण्यात आकाश मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात १८-१९ जूनपर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.






