सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने चाकण शहराला झोडपले; जनजीवन विस्कळीत (File Photo)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच सर्वांना पावसाची प्रतिक्षा लागलेली आहे. भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या मान्सूनचे ढग देशाच्या नकाशावरून गायब झाल्याचे चित्र आहे. जून अर्धा उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्रासह देशातील सुमारे 16 राज्यांना दमदार मान्सूनची प्रतीक्षा असून, या कालावधीतील सरासरीच्या ६४ टक्के पाऊस कमी पडल्याने चिंतेचे ढग आणखी गडद झाले आहेत.
यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहणार असून सरासरीच्या ९० टक्केच पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, त्याहून भयंकर स्थिती राहणार असल्याचे चित्र सध्या आहे. जून महिला अर्धा उलटला साधारणपणे याच काळात देशभरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असते. नद्या, नाले भरून वाहू लागतात. शेतकरी पेरणी सुरू करतात. मात्र, यंदा नैऋत्य मान्सूची गती चांगलीच मंदावली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, ४ जून ते १५ जून कालावधीत सरासरी ५४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना तो अवघा १९ मिमी पडला आहे. देशात तब्बल ६४ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. देशातील काही राज्यांमध्ये पावसाचे प्रवेश केला परंतु तो पुढे सरकलेला नाही. महाराष्ट्रासह देशातील सुमारे १६ राज्यांना दमदार मान्सूनची प्रतीक्षा आहे.
अडथळ्याची काही प्रमुख कारणे
सध्या वातावरणाच्या वरच्या थरातील वाहणारी वेस्टलीं जेट स्ट्रीम ही पश्चिमेकडे वाहणारी जोरदार वाऱ्याची पट्टी नेहमीपेक्षा दक्षिणेकडे सरकली आहे. परिणामी मान्सूनला बळ देणाऱ्या ईस्टर्ली जेट स्ट्रीमच्या कार्यात अडथळा निर्माण झाला आहे. सर्वसामान्यपणे पूर्वेकडील वारे वरच्या दिशेने हवा खेचतात, त्यामुळे ढग तयार होऊन पाऊस पडतो. यंदा पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने ढगांची निर्मिती आणि विस्तार लांबला आहे. परिणामी, समुद्रावर भरपूर ढग व आर्द्रता असूनही ते भारताच्या मुख्य भागावर पोहोचू शकलेले नाहीत.
हवामानातील बदल 18 जूनपर्यंत राहणार
नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे आणि सक्रिय उत्तर पश्चिमी वाऱ्यांमुळे हवामानात लक्षणीय बदल झाले आहेत. जम्मू आणि काश्मीरपासून ते किनारपट्टीवरील कर्नाटकापर्यंत पाऊस आणि मेघगर्जना झाली. तसेच, ताशी ५०-७० किमी वेगाच्या वाऱ्यांसह आलेल्या वादळांनी विविध भागांमध्ये हाहा:कार माजवल्याचे दिसून आले. बिहारमध्ये वीज पडून १० जणांचा मृत्यू झाला होता. तर पंजाबमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. हवामानातील हा बदल किमान १८ जूनपर्यंत सुरू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.






