Photo : Kolhapur Rain
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असणाऱ्या संततधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील 150 गावे पुराच्या विळख्यात सापडली असून, अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 41 फूट इतकी आहे. धोका पातळी गाठण्यास अवघे 2 फूट शिल्लक असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या बाधित गावांना सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढत आहे. नदीची धोका पातळी 41 फुटांवर आहे. हवामान विभागाने आज जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला असून, त्याप्रमाणे पाऊस पडला तर महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून, त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. पूरप्रवण क्षेत्रातील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी स्थलांतराची तयारी सुरू आहे.
संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याने पुराचा फटका बसणाऱ्या कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागात स्थलांतर मोहीम राबवली जात आहे. कोल्हापुरात ७८ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून, ग्रामीण भागातही स्थलांतर सुरू आहे. कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल परिसरातील विटभट्टीजवळील ५८ व सुतारवाडा येथील २० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.
नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर ९० टक्के पाण्याखाली
नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पात्रात गेल्या २४ तासांत साधारण पाच फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दत्त मंदिर नव्वद टक्के पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. नदीकाठच्या शेतात देखील सर्वत्र पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अलमट्टीतून दीड लाख क्युसेकचा विसर्ग कायम
चिक्कोडी : अलमट्टी जलाशयातून सोमवारीही दीड लाख क्युसेकचा विसर्ग कायम ठेवला आहे. दोन दिवसांच्या तुलनेत धरणात पाण्याची आवक थोडीशी वाढली असली, तरी विसर्ग कायम ठेवल्याने कृष्णेची पातळी गतीने वाढलेली नाही. धरणात ९३ टीएमसी पाणीसाठा आहे.