संग्रहित फोटो
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर (Rain in Satara) कायम असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात नवजा येथे सर्वाधिक 92 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने कोयना धरणातील (Koyna Dam) पाणीसाठा 12.90 टीएमसी झाला होता. त्याचबरोबर धरणात 9000 क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे.
जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला तरीही मागील सात दिवसापासून जिल्ह्याचा पूर्व भाग वगळता पश्चिमेकडे सर्वदूर पाऊस पोहोचला आहे. कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वरसह कांदा टी कोयना खोऱ्यातील नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. या भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात कोयनानगर येथे 59 मिलिमीटर तर नवजाला 92 महाबळेश्वर येथे 85 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या महिन्याभरात कोयनेला 463 नवजाला 631 तर सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला 808 मिलिमीटर झाला आहे. पश्चिम भागातील धोम, बलकवडी कण्हेर तारळी, कोयना धरण क्षेत्रात कमी अधिक फरकाने पाऊस सुरू आहे. कोयना क्षेत्रात पाऊस अधिक होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सात दिवसात जवळपास अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे धरणात शनिवारी सकाळच्या सुमारास 9291 पाण्याची आवक होत होती. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस असला तरी पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरणी रखडले असून, काही ठिकाणी पाणीटंचाईची सावट आहे. येत्या काही दिवसात पाऊस वाढल्यास खरिपाची पेरणी होऊ शकते. नाहीतर शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सातारा शहरात सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून साताऱ्यात जोरदार सरी तासभर कोसळल्या. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांची चांगलीच अडचण झाली.






