सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले; जिल्ह्यात अनेक रस्ते बंद, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
सांगली : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात सांगली जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील 17 हून अधिक रस्ते बंद झाले, अनेक ठिकाणी घरात, दुकानात पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले.
शनिवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी नदी आणि ओढ्यांच्या पात्रातून पावसाचे पाणी पात्राबाहेर पडले. परिणामी, जिल्ह्यातील सुमारे १७ प्रमुख, व इतर रस्ते बंद झाले. या ठिकणी प्रशासनाकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तात्काळ फलक लावून हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याने, प्रशासन अलर्ट मोडवर गेले. जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस प्रमुख संदीप घुगे, मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी सर्वत्र यंत्रणा अलर्ट केल. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व लवकरच पंचनामे सुरु होणार असल्याचे सांगून शासकीय निकषानुसार मदत मिळणार असे आश्वासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.
शहरातील जनजीवन विस्कळीत
सांगली महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची दैना उडाली. मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी सूचना दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा अखेर रस्त्यावर उतरून ड्रेनेज सफाई करून तुंबलेल्या गटारी, नाले मोकळे केले. हे काम करताना अग्निशमन विभागाची आणि मनपा प्रशासनाची दमछाक झाली. या पावसामुळे नालेसफाई व अतिक्रमणांनी महापालिकेचे पितळ उघडे असल्याचे समाजमाध्यमांवर बोलले गेले.
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
कृष्णा, वारणा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसाने नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. कोयना धरणातून वीस हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. रविवारी ३० हजारापर्यंत वाढू शकतो. शनिवारी सांयकाळी सांगलीत कृष्णा पातळी १७ फुटांवर होती, पावसानंतर ती २५ ते २८ फुटापर्यंत जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain Live Update: महाराष्ट्रात पावसाचे तांडव सुरूच राहणार; नेमकं काय आहे या आस्मानी संकटाचे कारण?