मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग; परभणी, नांदेडसह हिंगोलीत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टी
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. त्यात आता मोठ्या खंडानंतर पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले आहे. गुरुवारी, शुक्रवारी दिवसभरात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. विभागीय आयुक्त कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, विभागातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा अधिक जोर होता. येथील एकूण १६ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जवळपास आठवडाभरापासून पावसाची प्रतीक्षा होती. पावसाअभावी पिकेही सुकून जात होती. शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या काळात कडक ऊन पडत असल्यानेही पिकांना धोका निर्माण झाला होता. परंतु, गुरुवारी सकाळी सात ते आठच्या सुमारास पावसाने सर्वत्र पुनरागमन करून दिलासा दिला. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात अधूनमधून पावसाची हजेरी सुरु होती.
विभागात गुरुवारी सकाळी ते शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण १४. ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक ४८. ८ मिमी हिंगोली, त्यानंतर नांदेडमध्ये ३०.० मिमी तर परभणी जिल्ह्यात २३.५ मिमी पाऊस झाला आहे. या तिन्ही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, मराठवाड्यात पावसाची बॅटिंग सुरु झाली असली तरी संभाजीनगर, जालना, बीड, लातुरात मात्र पावसाने किरकोळ हजेरी दिल्याचे चित्र आहे.
१६ मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी
गुरुवारी हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण १६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यात नांदेडमधील नांदेड ग्रामीण, तरोडा, शिवणी, गोळेगाव, दाभाडमध्ये, परभणी जिल्ह्यातील बामणी, बोरी, आडगाव, ताडकळस, लीमाला, तर हिगोली जिल्ह्यातील नरसी, कळमनुरी, वाकोडी, नंदापूर, वारंगा आणि सेनगाव सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
दुबार पेरणीचे संकट टळले
सध्या विभागात पिके चांगली अंकुरली आहेत. अशावेळी पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. परंतु, पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अनेक ठिकाणी जलस्रोतातून पिकांना सिंचन केले जात आहे. मात्र, सिंचन सुविधा नसलेल्या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट होते. आता ते टळले आहे.