राज्याच्या विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागांमध्ये प्रचंड पावसाची नोंद झाली आहे. येत्या ३६ तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल होताच अवघ्या २४ तासांत तो कोकणात पोहोचला. यंदा बारा दिवस आधीच मान्सून कोकणात दाखल झाला असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रत्नागिरीतील काही भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती असून, प्रशासन सतर्क आहे.रविवारी पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. बारामतीमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. सोमवारी राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
सातारा,
रत्नागिरी,
सिंधुदुर्ग,
कोल्हापूर,
रायगड,
बुलढाणा
मंदिरे पाण्याने वेढली गेली आहे
कोकणात प्रचंड पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात दमदार पावसामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नीरा नदीतून सध्या ३०,००० क्सूसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटीशकालीन पूल पाण्याखाली गेला आहे, तसेच पुंडलिक मंदिर आणि इतर मंदिरे पाण्याने वेढली गेली आहेत.
मुंबई, पुण्यात संततधार, वाहतूक विस्कळीत
मुंबईत रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. जे.जे. उड्डाणपुलावर पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुढील दोन तास मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. काही घरांमध्ये पाणी शिरले असून शासकीय रुग्णालयातही पाणी साचले आहे.
पिकांचे मोठे नुकसान
पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. विदर्भात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उन्हाळी मुगाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातही पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रात पावसाने ब्रेक घेतला असून, नाशिक आणि जळगावात पावसाला विश्रांती मिळाली आहे.
Pune News : अरुंद बोळामध्ये जाऊन अडकली गाई; दहा तासानंतर गरोदर गो-मातेची सुखरुप सुटका