भिगवण : पुणे आणि सोलापूर (Pune- Solapur)जिल्ह्यांना जोडणारा दीडशे वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन डिकसळ पूल सोमवार( दि. १०) पासून अवजड वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच प्रशासनाच्यावतीने पुलावर मोठे लोखंडी बॅरिकेट्स लावून अवजड वाहतूक बंद केली.सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या या पुलाचे दगडी बांधकाम काही ठिकाणी निखळू लागले होते. स्थानिक ग्रामस्थांनी सिमेंट आणि विटांचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात त्याची डागडुजी केली होती. मात्र, हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी लावून धरली होती.
करमाळा तालुक्यातील नव्हे तर मराठवाड्यातील लोकांना पुणे व मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या पुलाचा वापर होत होता. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश उसाची वाहतूक या पुलावरूनच बारामती ऍग्रो, अंबालिका, दौंड ऍग्रो, इंदापूर या साखर कारखान्यांना होत होती. या पुलावरून जड वाहतूक होत असल्याने हा पूल मागे काही वर्षांपूर्वीही जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या भागातील जड वाहतूक करण्यासाठी वाहतूकदारांना ५० ते ६० किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. म्हणून काही राजकीय मंडळींनी यात मध्यस्थी करून पुन्हा चालू केला होता. आता तो पुन्हा बंद करण्यात आला आहे.
-ऊस, वाळूसाठी वाहतूक पुन्हा सुरु होण्याची चर्चा
मात्र, या पुलावरून मोठ्या प्रमाणात ऊस आणि वाळू वाहतूक होत असल्याने हा पूल जास्त दिवस बंद राहणार नाही. कारण या भागातील ऊस हा पुणे जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना जात असल्यामुळे हा पूल लगेच काही दिवसात पुनःश्च सुरू केला जाईल, अशी चर्चा या भागातील नागरिकांत सुरू आहे.
-दुर्घटना होऊ नये यासाठी अवजड वाहतूक बंद
दरम्यान, सध्या उजनी धरण तुडुंब भरले असून धरणा त ११७ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कोकणातील सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काही अघटीत घटना घडू नये, म्हणून हा पूल प्रशासनाने जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.






