संग्रहित फोटो
पुणे : वाढलेले गंभीर अपघात रोखण्यासाठी व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्ग परिसरातील भूमकर चौक भुयारी मार्ग ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौकदरम्यान जड वाहनांना बंदी घातली आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी हे आदेश दिले. सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी असणार आहे.
नऱ्हे, धायरी परिसराचा पुणे महापालिकेत समावेश झाला आहे. या भागात शैक्षणिक संस्था, खासगी कंपन्या आणि मोठ्या प्रमामात रुग्णालये, हॉटेल्स व्यवसायिक आहेत. रहिवाशी भाग देखील मोठा वाढला आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण परिसरातील अनेक इमारती आहेत. या भागातील वाहतूक, वाढती लोकसंख्या, तसेच अपघातांचे प्रमाण विचारात घेऊन भूमकर चौकातील भुयारी मार्ग ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौक दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत.
भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौक दरम्यानचा मार्ग अरुंद आहे. या भागात गर्दीच्या वेळी दररोज सकाळी आणि सायंकाळी जड वाहनांमुळे कोंडी होते. त्यामुळे दररोज सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. या परिसरातील रस्ते, अंतर्गत रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट देण्यात आली आहे, असे पोलीस उपायु्क्त झेंडे यांनी कळविले आहे.
वाहने लावण्यास मनाई
सिंहगड रस्त्यावरील मॅकडोनाल्डस् उपहारगृहसमोर दोन्ही बाजूस ५० मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालय, येरवडा, गोल्फ क्लब रस्ता येथे लेखी स्वरुपात कळावाव्यात, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
दीर- भावजयचा मृत्यू
पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.