छत्रपती संभाजीनगर : संक्रांत संपली की थंडी तीळ तीळ कमी होते, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात मराठवाड्यातील नागरिक अजूनही हिवाळा अनुभवत आहे. याला कारण उत्तराखंडसह इतर याज्यात थंडी व धुक्याचा वाढलेला मुक्काम. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी कमी होत जाते. पण यावर्षी हवामानाचा नूरच पालटलेला दिसत आहे.
गेल्या पंधरवड्यात अवकाळी पावसाने फटका दिला. यानंतर थंडी गायब झाली होती. त्यानंतर पुन्हा थंडी पडू लागली. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वातावरणात पुन्हा बदलले. दाट धुक्याचा परिणाम येथेही झाला. मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात तापमानाचा पारा उतरला. वास्तविक हिवाळ्यालाही वातावरण बदलाचा फटका बसला. मोसमातील बहुतांश कालावधीत ढगाळ वातावरण होते. थंडी कमी होत असतानाच दाट धुक्याचा परिणाम स्थानिक हवामानावरही झाला.
उत्तरेकडील राज्यात थंडीचे प्रमाण जास्त आहे, बहुतांश ठिकाणी दाट धुके पसरलेले आहे. याचा परिणाम मराठवाड्यातील हवामानावर होत आहे. छत्रपती संभाजीनगर हे गुजरात आणि मध्यप्रदेश यांच्या मध्यावर आहे, आणखी चार दिवस थंडी राहील, दोन दिवस कडाका जाणवेल.
– डॉ. श्रीनिवास औधकर, संचालक, एमजीएम वेधशाळा.