मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरून लाऊडस्पीकर (Loudspeaker Row) काढण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी प्रसंगी कठोर पावले उचला, असे स्पष्ट आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिले आहेत.
आज झालेल्या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. राज्यातील शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचलण्याचे गृहमंत्र्यांनी दिले. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खबरदारीचा उपाय म्हणून काहींना नोटीस देण्यात आल्या आहेत. तेढ निर्माण करताना एखादी व्यक्ती, गट आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील संवेदनशील भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या बैठकीनंतर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेत कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचे नागरिकांना आवाहन केले. पोलीस महासंचालकांनी सांगितले की, आम्ही स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या आहेत. राज्यात कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही. जे कायदा बिघडवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.