होमगार्डने कारला थांबवण्याचा प्रयत्न केला अन् तोच अंगलट आला; नंतर कार खालीच... (संग्रहित फोटो)
नागपूर : नाकाबंदी दरम्यान वाहतूक पोलिसांसोबत कर्तव्यावर तैनात होमगार्डने संशयावरून एका कारच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने थांबण्याऐवजी कारचा वेग वाढवून होमगार्डलाच कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाहीतर बचावासाठी कारच्या बोनटवर चढलेल्या होमगार्डला तो उड्डाणपुलावरून ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत फरफटत घेऊन गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.
एलआयसी चौकातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. याप्रकरणी सदर पोलिसांनी होमगार्ड श्रेयस मानकरच्या तक्रारीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रेयस मानकर हा होमगार्ड असून, गुरुवारी सायंकाळी एलआयसी चौकातील एमएसईबी वाय पॉईंटवर नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करत होता. वाहतूक कर्मचारी अनिकेत यादव, अभिषेक यादव व पवन ठेपाले यांच्यासोबत श्रेयसही कर्तव्यावर तैनात होता.
हेदेखील वाचा : देव तारी त्याला…! दुचाकीवरून महिला पडली; मागून कार येत असतानाच अचानक ब्रेक दाबला अन्…
दरम्यान, एक कार संशयितरित्या भरधाव वेगात येताना दिसली. होमगार्डने कारच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, दारूच्या नशेतील चालकाने आणखी स्पीड वाढवला आणि कार होमगार्ड श्रेयसच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला. श्रेयसने वाचण्यासाठी कारच्या बोनटवर उडी घेतली. त्यानंतरही चालक थांबला नाही आणि त्याने श्रेयससह कार पळवली. या दरम्यान चालकाने श्रेयसला अनेकदा बोनटवरून खाली पाडत चिरडण्याचा प्रयत्न केला. आटोमोटिव्ह चौकाजवळ कारचा वेग मंदावताच श्रेयसने स्वतःला सावरत बोनेटवरून बाजूला उडी घेत आपला जीव वाचवला.
सहकारी पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्नही नाही
घटना घडत असताना श्रेयससोबत तैनात वाहतूक कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यामुळे आरोपी कार चालकास पळून जाण्याची पूर्ण संधी मिळाली. पोलिसांनी लगेच एअरवर वरिष्ठांना माहिती दिली असती तर आरोपी कार चालक उड्डाणपुलावरुन आटोमोटीव्ह चौकात उतरताच पोलिसांच्या हाती लागला असता. मात्र, असे काहीही घडले नसल्याचे दिसून येत आहे.






