‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) कन्नड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजनांचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. किती आले किती गेले आणि कितीही आघाड्या झाल्या तरी एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना भारी असल्याचं शिंदे म्हणाले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, उद्या संसद भवनाचे उद्घाटन करायचे आहे. पण त्याला विरोध करण्यात येत आहे. संसद भवन पवित्र मंदिर आहे. तिथे सर्व खासदार जाऊन बसतात, जनतेचे प्रश्न मांडतात. हे तर ऐतिहासिक काम असून, याला काय विरोध करतात. याचा अर्थ ही पोटदुखी आहे. या कामाचे मोदींना श्रेय मिळेल म्हणून विरोधकांची पोटदुखी सुरु आहे. तर केजरीवाल मुंबईत येतात ते एकाला भेटतात, दुसऱ्याला भेटतात आणि दुसरे तिसऱ्याला तिसरे पाचव्याला भेटत आहेत. हे त्याच्या दारी आणि ते त्याच्या दारी जात आहेत. पण आपण कोणाच्या दारी जात नाही. त्यामुळे किती आले किती गेले आणि कितीही आघाड्या झाल्या तरी एकटे मोदी सर्वांना भारी असल्याचं शिंदे म्हणाले.
काँग्रेसचा कार्यक्रमावर आक्षेप
काँग्रेस कार्यकर्त्यांनी या उद्घाटन सोहळ्याबाबत आक्षेप घेतला आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेले असताना वारंवार असे कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. जनतेच्या पैशातून भाजप-सेनेचा प्रचार सुरू असून आधी 182 गावातील जनतेला 52 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांचे उद्घाटन करून पाणी द्या अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. आज हे कार्यकर्ते शिर्डी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना कार्यक्रमस्थळी जाण्यापासून मज्जाव केलेला आहे.