सौजन्य - सोशल मिडीया
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा २६ सप्टेंबरला कोसळला अन् महाराष्ट्रभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. आज महाविकास आघाडी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यादरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले?
कोणत्याही गावात कोणताही पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असो किंवा मग तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असो, त्या पुतळ्यांना वेगळ्या संदेश रूपाने काही केलं तर दंगली होतात, आज इतका मोठा पुतळा पडला, मला समजत नाही, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत, झाल्या पाहिजेत. आज आम्ही महाविकास आघाडी मिळून जोडो मारो आंदोलन करत आहोत, पोलिस येऊ द्यात आता 40 वर्षांत आम्हाला सवय झाली आहे, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती, मोठमोठे नेते दंगलीची भाषा करत होते, त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे, त्यांना महाराष्ट्र शांत नकोय, राज्यात दंगली व्हाव्या, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी, असा प्रयत्न लोकसभेपूर्वी देखील झाला आहे. मात्र, राज्यातील जनता सुज्ञ आहे, संयमी आहे, म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत असल्याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खैरेंना दिलं आहे.
महाविकास आघाडी आक्रमक
आज महाविकास आघाडीकडून मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केलं जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाली नसतानाही आज (1 सप्टेंबर) महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मुंबईमधील हुतात्मा चौकात पोहोचले. कोणत्याही परिस्थितीत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढला. या मोर्चासाठी राज्यभरातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित आहेत.