नागपूर – नागपूरची चड्डी ज्याने घातली तर तो डायरेक्ट जॉइन्ट सेक्रेटरी पदावर जातो, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरून पटोलेंनी हा टोला लगावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशावर बोलण्याआधी आधी ‘आरएसएस’च्या शाखेवर जाऊन पाहावे, असे प्रत्युत्तर राम कदम यांनी दिले आहे.
बुलढाण्यात आयोजित एका कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. पटोले म्हणाले, लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. त्यात गोदी मीडिया एक आला. माध्यमांची व्यवस्था त्यांनी संपवली. न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे. न्यायमूर्ती माध्यमांसमोर येऊन आम्हाला वाचवा अशी विनंती करत आहेत.
नाना म्हणाले की, प्रशासकीय व्यवस्थेत कलेक्टर, एसपी, फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जायचे असेल, तर यूपीएससीची परिक्षा पास करावी लागते. मात्र, आता यूपीएससीची परीक्षा द्यायचीही गरज नाही. नागपूरचा गणवेश घातला की डायरेक्ट जॉइन्ट सेक्रेटरी होता येते, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर नाना पटोले यांनी केलेल्या अशाप्रकारच्या वक्तव्याने वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नाना पटोले यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.