Maharashtra Weather : राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता (File Photo : Weather Update)
Weather Update news in Marathi: राज्यात पुन्हा थंडीची लाट वाढली आहे. आता या थंडीला ब्रेक लागला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील थंडी गेली आहे. परंतु पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.तसेच बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. यामुळे राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तरेकडून येणारे थंड कोरडे वारे व अरबी समुद्रातून येणारी आर्द्र हवेमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्टही जारी केला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात २६ डिसेंबरला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर २७ तारखेला पुणे, पुणे घाट परिसर, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, वेलमार्क लोकेशन क्षेत्र बंगालच्या उपसागरात असून दक्षिण आंध्र प्रदेशच्या नैऋत्य दिशेला आहे. वायव्य राजस्थानमध्ये कमी दाबाचे क्षेत्र दिसत असून पुढील तीन दिवस विदर्भ वगळता राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर तुरळक परिसरात म्हणजे २६ व २७ डिसेंबर रोजी विदर्भ वगळता इतरत्र हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत विदर्भ वगळता राज्यातील किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात पुढील तीन दिवस सकाळी तुरळक धुक्यासह आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजे 26 आणि 27 तारखेला आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
26 आणि 27 डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिली.
२६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.