पुणे/ दीपक मुनोत : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक एकतर्फी होणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच निवडणूक रंगतदार होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपच्या वतीने मोहोळ यांचे नाव गत सप्ताहातच जाहीर करण्यात आले. पुण्यात मतदान १३ एप्रिलला असताना तब्बल दोन महिन्यांपुर्वीच मोहोळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. देशातील, सुरक्षित आणि खात्रीशीर मतदारसंघांची निवड करून भाजपने तेथील उमेदवार जाहीर केल्याचा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला.
पुण्यात मोहोळ यांना, जगदीश मुळीक, सुनिल देवधर आदींचे आव्हान असताना, पक्षाने मोहोळ यांच्या बाजुने कौल दिला. स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापौरपद भूषवणाऱ्या मोहोळ यांची उमेदवारी ही अर्थातच प्रतिस्पर्ध्यासाठी तुल्यबळ होती. भाजपच्या तुलनेत काँग्रेसकडे २० जणांनी उमेदवारी मागितली असली तरी एखाद दुसरा अपवाद वगळता तुल्यबळ उमेदवारांची वानवा होती. असे असताना, काँग्रेसने त्यातल्या त्यात तुल्यबळ अशा, धंगेकरांना रणांगणात उतरवल्याने वरकरणी एकतर्फी वाटणाऱ्या लढतीला चांगलीच कलाटणी मिळणार, असे चित्र दिसू लागले आहे. त्याचे कारणही तसेच आहे.
धंगेकर यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या, कसबा विधानसभा मतदारसंघात केवळ वर्षभरापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत, भाजपच्या उमेदवाराला चारीमुंड्या चित केले होते. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्रीमंडळाने पुण्यात ठिय्या मांडला असताना, साम, दाम, दंडाचा यथेच्छ वापर केल्यानंतरही, धंगेकर यांनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर हे यश संपादन करीत, ʻकसबा पॅटर्नʼ उदयास आणला. या पार्श्वभूमीवर, धंगेकर यांची उमेदवारी ही मोहोळ यांना टक्कर देणारी ठरणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
भाजपने, २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणूकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांना तब्बल ३ लाखांपेक्षा जास्त मतांनी धुळ चारली होती. हे प्रचंड मताधिक्क्य कायम राखणे हे मोहोळांसमोरचे आव्हान असेल तर ते कमी करून विजयाप्रत जात ʻकसबा पॅटर्नʼची लोकसभेला पुनरावृत्ती करणे, हे आव्हान धंगेकरांना पेलावे लागणार आहे. धंगेकर यांच्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली, हे खरे असले तरी आजही कागदावर भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच मोहोळ यांचे पारडे जड आहे.
कोणत्याही क्षणी कलाटणी
मतदारसंघातील ६ पैकी ४ आमदार आणि प्रबळ संघटन, या जोरावर मोहोळ बाजी मारू शकतात. असे असले तरी मतदानाला अजूनही ५० दिवसांचा कालावधी बाकी असल्याने या कालावधीत कोणत्याही क्षणी कलाटणी मिळू शकते. कसब्याचा चमत्कार धंगेकर करून दाखवतात का, हीच या निवडणुकीतील खरी उत्सुकता राहणार आहे.