भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर साताऱ्यामध्ये बाईक रॅली काढून उत्साह दिसून आला (फोटो - टीम नवराष्ट्र)
सातारा : भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करून ते पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहेत. या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ९ दहशतवादी ठिकाणांवर भारतीय लष्कराने हल्ले केले आहेत. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराला कोणत्याही प्रकारे लक्ष्य करण्यात आलेले नाही. तसेच पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांना देखील लक्ष्य करण्यात आले नाही. एकही पाकिस्तानी नागरिक यामध्ये जखमी नाही. ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता, अशी कारवाई भारतीय लष्कराने केली. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी ‘भारतमाता की जय’ असे म्हणत आनंद व्यक्त केला.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पंधरा दिवसांपूर्वी काश्मीरच्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक पहलगाम येथे गेले होते. या निशस्त्र पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. तुमचा धर्म कोणता, असे विचारून हिंदू मुसलमान नागरिकांना वेगळे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या दरम्यान त्यांनी काही जणांना कुराणातील ‘आयत’ म्हणायली लावली. ज्यांना म्हणता आली नाही, त्यांना त्याक्षणी गोळ्या मारण्यात आल्या. या हल्ल्यात जवळपास २७ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पहलगाममधील दहशतवाद्यांनी बैसरन पहलगाममध्ये हल्ला केला तेव्हा त्यांनी कोणत्याही महिलेची हत्या केली नाही. खरे तर, दहशतवाद्यांना केवळ पुरुषांना लक्ष्य करून त्यांनाच मारण्याचा प्लॅन होता. म्हणूनच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. आपल्या आई बहिणींचे कुंकू पुसणाऱ्यांना भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे चांगलाच धडा शिकवला असून त्याचा आनंद होत असल्याचे राऊत यांनी पत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार
भारताच्या या ऑपरेशन सिंदूरनंतर राजधानी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. यामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वपूर्ण आणि सूचक वक्तव्य केली आहेत. सर्वपक्षीय बैठकीमध्ये राजनाथ सिंह म्हणाले की, सिंदूर ऑपरेशन या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास 100 अतिरेकी मारले गेले आहेत. भारताला परिस्थिती आणखी चिघळायची नाही. पण जर पाकिस्तानने काही आगळीक केल्यास भारत शांत बसणार नाही. ऑपरेशन सिंदूर हे अजून संपलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, सदर मोहीम संवेदनशील असल्यामुळे याव्यतिरिक्त केंद्र सरकारकडून जादा माहिती दिलेली नाही. तसेच ऑपरेशन सिंदूर हे अजून सुरु असल्यामुळे मृतांचा आकडा समोर आलेला नाही. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतर काही मंत्री उपस्थित होते. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खर्गेनीही बैठकीला हजेरी लावली होती. मात्र सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनुपस्थित होते.