इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली (फोटो- सोशल मिडिया)
आळंदी: पिंपरी चिंचवड महानगर पालिका, तसेच उगमस्थानापासून विविध ठिकाणी नदीपात्रात मिसळत जाणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला आता हिमनगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शुक्रवारी (दि. ४) सकाळपासून इंद्रायणीच्या पात्रात पांढराशुभ्र फेसाचे मोठ्या आकारातील थर तरंगत असल्याने भाविकांचे, तसेच जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणाची पातळी मोठी असल्याने इंद्रायणीच्या पात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
चिखली, कुदळवाडीतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केल्यानंतर इंद्रायणीतील प्रदूषण कमी होईल, असा दावा तेथील राजकीय मंडळी करत होती. मात्र, हा दावा पूर्णतः फोल ठरला आहे. कारण, अद्यापपर्यंत इंद्रायणीच्या प्रदूषणाची पातळी अजिबात कमी झाली नाही. याउलट महापालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे दिवसेंदिवस इंद्रायणीतील पाण्याला उग्र वास, कधी हिरवट तर कधी काळपट रंग होत आहे. याचबरोबर इंद्रायणीच्या उगमस्थानापासून विविध ग्रामपंचायती, नगरपरिषद हद्दीतील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळले जात आहे. एवढेच काय केळगाव ग्रामपंचायत, आळंदी नगरपरिषदेचे सांडपाणीही इंद्रायणीत सोडले जात आहे.
सांडपाण्यामुळे नदीपात्राला गटारीचे स्वरूप
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांश ठिकाणच्या नद्यांचे पाणी आटते. मात्र, आळंदीतील इंद्रायणीला विविध गावच्या सांडपाण्याचे वाहून येण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे नदी बारमाही वाहत असल्याचे चित्र आहे. सध्या आळंदीतील इंद्रायणीत कोठेही जा सांडपाण्यामुळे नदीपात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठिकठिकाणी काळपट रंगाचे पाणी वाहताना दिसते. याचबरोबर जलपर्णीही मोठ्या प्रमाणात आहे.
Devendra Fadnavis: “… हे एका दिवसाचे काम नाही”; फेसाळलेल्या ‘इंद्रायणी’बाबत CM फडणवीसांचे भाष्य
प्रदूषित पाणी असूनही आळंदीत इंद्रायणी घाटावर अनेक नागरिक या प्रदूषित पाण्यातच स्नान करतात. आचमन करतात. काही लोक कपडे धुतात. गाड्याही धुतात. मात्र, स्थानिक पातळीवर नगर परिषद प्रशासन यावर कोणत्याही प्रकारची बंदी घालताना दिसत नसल्याचे चित्र आहे. प्रदूषणामुळे जलचर प्राण्याचे आरोग्य धोक्यात आले आहे.
फेसाळलेल्या ‘इंद्रायणी’बाबत CM फडणवीसांचे भाष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. हे एका दिवसाचे काम नाही. सर्व गाव, शहरात उद्योगांचे पाणी जे इंद्रायणी मध्ये जाते ते साफ करुन शुद्ध पाणी नदीत सोडायचे आहे. त्याचे काम सुरु केले आहे. यासाठी वेगवेगळी गावे, ग्रामपंचायत, नगरपंचायतींना निधी उपलब्ध करुन देत आहोत. तसे उद्योगांना देखील निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच इंद्रायणी स्वच्छ होणार आहे.