बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलन प्रकरणी पोलिसांनी तब्बल 90 पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केलेले हे आंदोलन पोलिसांच्या डोळ्यात भरले असून आता न्याय मागणे ही गुन्हा ठरत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात अघोषित आणीबाणी आहे का..? असा सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी 19 जानेवारीला मलकापूर स्थानकात रेल्वे रोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र बुलढाणा पोलिसांनी त्यांना 18 तारखेला रात्री मलकापूरकडे जात असतानाच ताब्यात घेतले. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यावर त्यांच्याविरुद्ध १५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना मध्यरात्री मेहकर पोलीस ठाण्यात नेण्यात आले व पुन्हा बुलढाण्यात आणण्यात आले. 19 तारखेला बुलढाणा न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची सुटका केली.
रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात असतांना त्यांच्या पत्नी ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मलकापूर येथे आंदोलन केले. शांततेत चालू असलेल्या या आंदोलनातील शेतकऱ्यांना पोलिसांकडून मारहाण झाली. तरी शेतकरी व कार्यकर्त्यांनी नीटपणे पोलिसांच्या काठ्या झेलल्या. तर दुसरीकडे या आंदोलनामुळे मलकापूर पोलिसांनी ॲड. शर्वरी रविकांत तुपकर, अमोल राऊत, निलेश नारखेडे, साचिन शिंगोटे, सुरज देवले, नितीन राजपुत, विनायक सरनाईक, अकाश राऊत, गजानन भोपले, अर्चना तुपकर, रुपाली जेऊघाले व इतर ३२ कार्यकर्ते शेतकऱ्यांवर कलम १८६, १४३भारतीय दंड संहीता, कलम १३५ मुंबई पोलीस कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान रविकांत तुपकरांना मेहकर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आल्यानंतर तिथे जमा झालेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. रविकांत तुपकर यांनाच बेकायदेशीर अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा अटकेचा निषेध करणाऱ्या व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केलेल्या आंदोलकांवर देखील पोलिसांनी गुन्हे दाखल करून एक प्रकारे आंदोलकांवर दडपशाही करण्याचा हा प्रकार केल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत आहे.
आम्हाला तुरुंगात टाकणं, माऱ्यामाऱ्या घडवून आणणं, आम्हाला टार्गेट करणं, असा उद्योग सत्ताधारी नेत्यांनी चालवलेला आहे. ही अघोषिट आणीबाणी चालू देणार नाही. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन शेतकरी चळवळीचा आवाज दाबता येणार नाही, शेतकऱ्यांसाठी लढत राहणार, असे रविकांत तुपकर म्हणाले आहेत.