संतापजनक! गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरलं, जालन्यातील प्रकार
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खापरखेडा वाडी गावातील एक गर्भवती महिला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तपासणीच्या प्रक्रियेत तिच्या पोटावर डॉपलर टेस्टदरम्यान वापरण्यात येणाऱ्या जेलीऐवजी चुकून फिनायल लावल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे महिलेच्या पोटाची त्वचा भाजून निघाली असून, तिच्यावर सध्या औषधोपचार सुरू आहेत.
Pune Crime: पुणे RPF ची मोठी कारवाई; 7 महिन्यांच्या बालकाच्या अपहरणाचा डाव उधळून लावला, 2 जणांना अटक
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिला संदीप भालेराव या तिसऱ्यांदा गरोदर राहिलेल्या महिलेला सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रसुती झाली. बाळाचे ठोके तपासण्यासाठी डॉपलर टेस्ट करताना संबंधित नर्सकडून चुकून जेलीऐवजी फिनायलसारख्या द्रव्याचा वापर झाला. त्यामुळे महिलेच्या पोटावर ‘सुपरफिशियल बर्न’ म्हणजेच वरवरची आग होऊन त्वचेला इजा झाली. हे घडलेले अपघाताने की हेतुपुरस्सर, याबाबत वैद्यकीय अधिक्षकांकडून चौकशी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, बाळ आणि आई दोघेही सध्या स्थिर आणि सुरक्षित आहेत, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. रुग्णालयात सामान्यतः अॅसिडचा वापर होत नाही, त्यामुळे वापरलेले द्रव्य फिनायल असण्याची शक्यता आहे. संबंधित नर्स व डॉक्टर यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पीडित महिलेच्या नातेवाईकांनीही याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. “सकाळी सहा वाजता आम्ही महिलेला रुग्णालयात आणलं. त्यांनी बाळाचे ठोके ऐकायचे आहेत, असं सांगितलं. पण त्याऐवजी त्यांनी काहीतरी रसायन लावलं, ज्यामुळे तिचं पोटच भाजून निघालं,” असा आरोप नातेवाईकांनी केला. हा प्रकार आरोग्य यंत्रणेकडील निष्काळजीपणाचे उदाहरण ठरत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.