'पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?'; जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर (File Photo : Jayant Patil)
मुंबई : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मोठी दंगल उसळली होती. त्यानंतर हिंसाचारही झाला होता. या दंगलीच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गृहमंत्रालयाला चांगलेच सुनावले. ‘दंगल जर पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?’, अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरलं. पोलिस खाते काय करत होते? पूर्व नियोजित कट जर आधी पकडता आला, तर ते पोलिस खाते, असेही त्यांनी म्हटले आहे.
अंतिम आठवडा प्रस्तावावर माजी मंत्री जयंत पाटील बोलत होते. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात झालेल्या दंगलींची आकडेवारी जयंत पाटलांनी सभागृहात सांगितली. 2024 मध्ये देशात सर्वाधिक दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत, असे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली. नागपूर दंगलीवर पाटील म्हणाले, ‘पोलिस खातं काय करत होते? पूर्व नियोजित कट जर आधी पकडता आला, तर ते पोलिस खाते. म्हणजे आपणच कबूल करतोय. अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो. पूर्वनियोजित कट झाला आणि दंगल झाली. नागपूरसारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे…’
तसेच सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात. तिथे दंगल घडवून आणली म्हणजे दंगल घडवून दाखवणाऱ्याचे कौतुक आहे, असा उपरोधिक टोलाच त्यांनी गृहमंत्रालय आणि सरकारला लगावला.
दंगली का होतात?
2024 मध्ये देशात 59 जातीय दंगली झाल्या. त्यातील 12 दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत. 2022 पासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात जातीय दंगलींमध्ये वाढ झाली. 2024 मध्ये महाराष्ट्रात 12, गुजरात 5, मध्य प्रदेशात 5 आणि राजस्थानात तीन दंगली झाल्या. या दंगली का होतात? कशा होतात? या महाराष्ट्राचा आकडा एवढा वर जातोय. यातून किती अस्वस्थता आपण खाली तयार केली आहे, काम सरकारने करावे, असा सल्ला त्यांनी महायुती सरकारला दिला.
…त्या अधिकाऱ्याला अटक करा
नामदेव ढसाळ कोण आहे, असा प्रश्न विचारला जातो. आम्ही मागणी केली होती की, त्या अधिकाऱ्याला अटक करा आणि नामदेव ढसाळ यांचं साहित्य वाचायला द्या. सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू झाला याला पोलिस जबाबदार आहेत. त्याच्या आईला काय न्याय देणार आपण? अधिवेशन संपत आलं आहे, आता सोमनाथच्या कुटुंबीयांना आपल्याला न्याय द्यावा लागेल, असेही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.