पुणे : शहरातील टिळक रोडवर सुरु असलेल्या ड्रेनेज पाइपलाईनच्या कामासाठी जेसीबीद्वारे खोदकाम करताना शुक्रवारी (दि. २७) रात्री ११.५५ वाजता महावितरणची उच्चदाब भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे सदाशिव पेठ, टिळक रोड व नवी पेठच्या काही भागातील सुमारे १८०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रभर दुरुस्ती काम केल्यानंतर शनिवारी (दि. २८) सकाळी ११.३० च्या सुमारास या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, टिळक स्मारक मंदिराजवळ ड्रेनेजचे पाईपलाईन बदलण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी जेसीबीने खोदकाम करण्यात येत आहे. त्यामध्ये शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास महावितरणची भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आल्याने सदाशिव पेठ, टिळक रोड व नवी पेठ परिसरातील २५ रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला होता.
[read_also content=”पालकमंत्री बदलणं म्हणजे काय बाजारचा भाजीपाला असतो का?; दत्तात्रय भरणे यांची तिखट प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/maharashtra/what-is-the-meaning-of-changing-the-guardian-minister-dattatrayas-sharp-reaction-nrdm-285906.html”]
दरम्यान महावितरणने सर्वप्रथम २५ पैकी १२ रोहित्रांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु केला. परंतु १३ रोहित्रांवरील सुमारे १८०० ग्राहकांना पर्यायी वीजपुरवठा करणे शक्य झाले नाही. महावितरणकडून तातडीने भूमिगत वाहिनीची तपासणी करण्यात आली व तोडलेल्या वीजवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये दोन ठिकाणी जॉईंट द्यावे लागले. दुरुस्ती व चाचणी झाल्यानंतर शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास सर्वच रोहित्रांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.