फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पुणे : राज्याचे वातावरण आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तापले आहे. ओबीसी विरुद्ध मराठा अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आग्रही आहेत. तर ओबीसीमधून आरक्षण देऊ नये म्हणून लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. हाके आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरु असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समाजाचे स्वास्थ बिघडण्यासाठी सरकार जबाबदार असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
हे धंदे वाईट
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाजातील या परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याची टीका केली. आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ बिघडवू नका मी पहिल्यापासून म्हणतोय. हे सगळं सरकार याला जबाबदार आहे. याला भडकव,त्याला भडकव आणि याला आग लाव त्याला आग लाव हा सगळा सरकारचा खेळ आहे. मात्र हे धंदे वाईट आहेत. संविधानाप्रमाणे जे होत असेल ते होऊन द्या. ताणतणाव होईल असं कोणीही वागू नये, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
या सरकारचा मी निषेध व्यक्त करतो
राज्यामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. यावेळी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार गटामध्ये जाण्याच्या चर्चा आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले, अद्याप माझ्या संपर्कात कुणीही आमदार नाही. विधानसभेसाठी आम्ही सगळे दौरे करणार आहोत. महाराष्ट्राभर दौरे करणार आहोत. भाजप कुठले कार्ड कधी खेळेल आणि प्रत्येक वेळी त्यांचेच निघेल असं काही नाही. जुगार खेळण्याची सवय भारतीय लोकशाहीला शोभणारी नाही. ओबीसी नेते जातीला सोडून जाणार नाही. मी म्हणत होतो, भुजबळ जे बोलत आहेत ते चुकीचं बोलतात,ओबीसी आरक्षणाला काही होणार नाही. हे सरकार मागासवर्गींयाच्या विरोधात आहे, बार्टी, सारथी व महाज्योती या विद्यार्थ्यांच्या सोबत मी आहे. हे सरकार मागासवर्गींयांना शिकून देत नाही, या सरकारचा मी निषेध व्यक्त करतो, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.