कल्याण: कल्याण शहरामध्ये एका पडीक इमारतीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह (Kalyan Crime News) सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ (Crime News) उडाली. 13 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या या मुलीची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या मुलीच्या प्रियकराचा मृतदेह देखील रेल्वे रुळावर सापडला आहे. प्रियकरानेच या मुलीचा खून (murder)करुन नंतर स्वतः आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
कृष्णा शिरसाट असे त्या आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. त्याने ट्रेनखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली आहे. त्यानंतर कल्याण पश्चिम येथील सिंडीकेट परिसरात एका पडीक इमारतीमधून दुर्गंधी येत असल्याने याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ही मुलगी 13 जानेवारीपासून बेपत्ता असल्याचे समोर आले.
मुलीच्या नातेवाईकांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. खडकपाडा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. पडीक इमारतीमधील मुलीच्या मृतदेहाच्या बाजूला पोलिसांना दोन मोबाईल आढळून आले. त्यातील एक मोबाईल मुलीचा असून दुसऱ्या मोबाईल मालकाचा शोध पोलिसांनी घेतला. माहिती काढल्यानंतर दुसरा मोबाईल कृष्णा शिरसाट याचा असल्याचे समोर आले. त्याची शोधाशोध पोलिसांनी सुरु केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. कृष्णाने देखील 14 जानेवारी रोजी ट्रेन खाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या करत जीवन संपवले आहे. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलिस करीत आहेत. कृष्णा हा जालना येथील राहणारा आहे. अल्पवयीन मुलीची हत्या कोणी केली. कृष्णा हा या मुलीचा प्रियकर असल्याचे सांगितले जाते. त्याने तिची हत्या करुन मग स्वत: आत्महत्या केली का दुसऱ्या कोणी त्यांची हत्या केली याचा शोध खडकपाडा पोलिस करत आहेत.