डोंबिवली : रक्षाबंधन साजरा करण्यासाठी आपल्या पतीसोबत नंदेच्या घरी आलेल्या पूजा सोळंके नावाच्या महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी महिलेचा पती आणि मयत महिलेसोबत इंस्टाग्रामवर चॅटिंग करणाऱ्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इंस्टाग्रामवर सातत्याने चॅटिंग करत असल्याने पती आणि पत्नीमध्ये वाद झाला होता. या वादानंतर पूजा सोळंके या महिलेने आत्महत्या केली होती.
डोंबिवली पूर्वेतील आजदेपाडा परिसरात जय गुरुदेव सोसायटी आहे. या सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून पूजा सोळंके नावाच्या महिलेने आत्महत्या केली. पूजाने आत्महत्या केल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली होती. पती करण आणि पूजा या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता त्या वादानंतर पूजा हिने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी आधी एडीआर दाखल करून पुढील तपास सुरू केला. आता या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पूजा हिचे पती करण सोळके आणि एक तरुण गोपाल शिंदे या दोघांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त करणे भादवी कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, पूजा आपल्या पतीसोबत मुक्ताईनगरला राहते. ती आपल्या पतीसोबत नंदेच्या घरी रक्षाबंधन साजरा करण्यासाठी आली होती. पूजा आणि गोपाल शिंदे नावाचा एक तरुण इंस्टाग्रामवर सातत्याने चॅटिंग करत होते. घटनेच्या दिवशी पूजा त्या तरुणासोबत चॅटिंग करत असताना पती करण याने पाहिले. दोघांमध्ये वाद झाला या वादामुळे पूजा हिने आत्महत्या केली. पूजाच्या कुटूंबियांच्या तक्रारीनंतर पती करण आणि इंस्टाग्रामवर चॅटिंग करणाऱ्या गोपाल शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी मानसिक त्रास दिल्याने पूजा हिने आत्महत्या केली असल्याचा आरोप पूजा हिच्या कुटुंबीयांनी केला आहे. सध्या या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी पती करण याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.