कल्याण : कल्याणमधील अतिधोकादायक असलेल्या एका इमारतीचा काही भाग कोसळला होता. या इमारतीमधील १०० कुुटुंबियांना त्वरीत इमारत खाली करण्याचे सांगण्यात आले. काही जणांनी घरे खाली केली. मात्र केडीएमसीकडून भोगवटा प्रमाण पत्र भाडेकरांना न दिले गेल्याने ५० हून अधिक कुटुंब जीव मुठीत धरुन त्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. या कुटूंबियांनी केडीएमसीत अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. केडीएमसी सुरक्षा रक्षकांनी त्यांना पिटाळून लावले. या कुटुंबियांसोबत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णीही होत्या. कोणतीही अप्रिय आणि अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
शहराच्या पश्चिम भागातील वस्तीतील मौलवी कपाऊंड येथील अतिधोकादायक इमारतीचा सज्जाचा काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत एक मुलगी आणि तिची आई जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्नीशमन दल आणि पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या धोकादायक इमारतील नागरिकांचे अन्य ठिकाणी स्थलांतर केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मौलवी कंपाऊंड ही धोकादायक इमारत आहे. या इमारतीला महापालिकेने यापूर्वीच नोटीस दिली आहे. एक इमारत तळ अधिक चार मजली आहे. तर दुसरी इमारत तळ अधिक एक या स्वरुपाची आहे. या इमारतीत ७५ घरे आहेत. या ठिकाणी बहुतांश लोक भाडेकरु आहेत. या इमारतीची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तळ अधिक चार मजली असलेल्या धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरचा सज्जा कोसळला. इमारतीच्या खालून जात असलेल्या मेहरुनिसा आणि त्यांची मुलगी तस्मीया या जखमी झाल्या होत्या. या घटनेची दखल घेत उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी या कुटुंबियांना अन्यत्र स्थलांतरीत केले जाईल. त्यांना भोगवटा दिले जाईल असे सांगितले होते. त्यांच्या या आश्वासनाचा पश्चात ४१ कुटुंबियांनी त्यांचे घर खाली केले. त्यांना भोगवटा प्रमाणपत्र दिले गेले नाही. ते पाहून अन्य कुटुंबियांनी त्यांची घरे खाली केली नाहीत. इमारत अतिधोकादायक असल्याने त्या ठिकाणी कुटुंबिय जीव मुठीत धरुन राहत आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळावे यासाठी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षकांनी त्यांना पिटाळून लावले आहे. या आधी एक वर्षापूर्वी अशाच एका इमारतील घरे खाली केली गेली. त्यांनाही भोगवटा प्रमाण पत्र दिले नाही. त्यामुळे लोक घरे खाली करीत नाहीत .
यासंदर्भात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी सांगितले की, ही इमारत अतिधोकादायक आहे. या इमारतीत राहणाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. जोपर्यंत नागरिक घरे खाली करीत नाही. तोपर्यंत भोगवटा प्रमाणपत्र देता येत नाही.