कराड पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; अहेरीतील अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध;
कराड : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कराड नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी अचानक कामबंद आंदोलन छेडले. काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
नगरपालिकेच्या आवारात एकत्र आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निषेधाच्या घोषणा देत बुधवारी सकाळी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. यानंतर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन सादर करण्यात आले. शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने सोपविलेली जबाबदारी पार पाडताना अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब असून अशा घटनांमुळे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे. अहेरी नगरपंचायतीतील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवेळी संबंधित अधिकाऱ्यावर झालेला हल्ला निषेधार्ह असून, या प्रकरणातील दोषींवर तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. मागण्यांची दखल न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक
शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कराड नगरपालिकेने सोमवारी व्यापक मोहीम राबवत कृष्णा नाका ते बसस्थानक या गजबजलेल्या पट्ट्यात धडक कारवाई केली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी सहा वाजेपर्यंत अखंड सुरू होती. या आठ तासांच्या कारवाईत तब्बल ३५ अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला.






