फोटो सौजन्य: नवराष्ट्र
कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग पासून सुगवे फाटा येथून गुडवण नेरळ या राज्यमार्ग दर्जाच्या रस्त्याने रुंदीकरण काम सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. या रस्त्यावर रुंदीकरण तसेच नवीन साकव पूल अशी कामे सुरू आहेत.ही सर्व काँक्रीटीकरणाची कामे असल्याने ती कामे होत असताना पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक बाब असते. मात्र पाण्याचा वापरच केला जात नसल्याने काँक्रीटीकरण किती टिकावू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
नेरळ गुढवण सुगवे राज्यमार्ग रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत.या रस्त्यामध्ये असलेले साकव पूल नव्याने बांधले जात असून संरक्षक भिंती देखील बांधल्या जात आहेत. या रस्त्यावरील सुरू असलेल्या साकव पुलाच्या ठिकाणी काँक्रीटीकरण झाल्यानंतर पाणी मारण्यात येत नाही. कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र त्यातील नेरळ पिंपळोली,आंत्रड,गुढवण,सुगवे या मार्गावडील आंत्रड ते पिंपळोली या दरम्यान असलेल्या पुलाचे काम सुरू आहे. पुलाची निर्मिती हा रस्त्याचा महत्त्वाचा भाग असतो आणि त्या त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे काम केल्यानंतर पाण्याचा वापर केल्यास ते बांधकाम मजबूत होत असते. कोणत्याही ठिकाणी सिमेंटचे बांधकाम झाल्यावर पाण्याचा वापर होत नाही आणि त्यामुळे रस्त्यावर सुरू असलेली काँक्रिटची कामे नित्कृष्ट होत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी या कामाबद्दल आवाज उठविला असता रस्त्याचे करोडींचे कामे सुरू असताना कुठेही अधिकारी वर्ग येऊन पाहणी करीत नाही. त्यामुळे रस्त्यावरील कामांचा दर्जा सुमार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
एम एम आर डी ए चे निधीमधून नेरळ गुडवण सुगवे राज्यमार्ग रस्त्यावरील कामे केली जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा कोणताही अधिकारी कामाची पाहणी करायला फिरकत नाही. त्यामुळे ठेकेदार कंपनी मनमानी करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अधिकारी वर्गाचे नंबर शोधून स्थानिक त्यांना या कामाबद्दल विचारणा करीत आहेत,पण त्यांचे फोन आल्यानंतर स्थानिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे औदार्य देखील प्राधिकरणाचे अधिकारी दाखवत नाहीत. त्यामुळे नित्कृष्टपणे काम करणाऱ्या ठेकेदारांचे कामाची चौकशी व्हावी अशी मागणी या भागातील स्थानिक करू लागले आहेत. बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराला याविषयी जाब विचारणार का? आणि पाणी का मारत नाही याविषयी चौकशी होणार का? की ठेकेदाराला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पाठीशी घालणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहेत तसेच त्या चौकशीवर या रस्त्याचे भवितव्य देखील अवलंबून आहे.






