वाकस गावामधून जाणाऱ्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. नेरळ कशेळे हा मार्ग भीमाशंकरकडे जाणारा मुख्य रस्ता. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. नेरळकडून कशेळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाकस येथे आदिवासी वाडीमधून येणारे सांडपाणी वाहत वाहत रस्त्याने जाते. त्यात भरीला भर म्हणजे गुरांचं शेण आणि घरातील कचरा देखील उघड्यावर टाकला जातो. यासगळ्याने हा राज्यमार्ग नव्हे तर घाणीचं साम्राज्य झालं आहे. या सगळ्याचा त्रास वाहनांचा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना देखील होत आहे.
नेरळ कशेळे मार्गावर वाकस येथे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तेथील आदिवासीवाडीमधून येणारे सांडपाणी हे रस्त्याच्या बाजूने गटार काढून ते सांडपाणी रस्त्यावर येणार नाही याची काळजी स्थानिक ग्रामपंचायतकडून घेण्याची गरज आहे. या समस्येवर कोणीही आवाज उठवायला तयार नाही असं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे.या सांडपाण्याचा स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालक यांना त्रास तर होत आहेच,लाखो रुपये खर्चून तयार केलेला रस्ता देखील लवकर खराब होण्यास कारणीभूत ठरत आहे.
वाकस येथील आदिवासीवाडी मधून येणारे सांडपाणी हे रस्त्यावरती न येण्यासाठी वाकस ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ व ग्रामपंचायत मध्ये असलेले प्रशासक यांना या समस्येबाबत आपली कैफियत सांगितले.त्यावेळी प्रशासक यांच्याकडून ग्रामसभेमध्ये या सांडपाण्याबाबत नियोजन करण्यात आले नाही. या सांडपाण्याकडे वाकस ग्रामपंचायत मधील प्रशासक यांच्याकडून वारंवार सांगून देखील याकडे दुर्लक्ष करण्याचे काम केले जात आहे. रस्त्यावर येणारा सांडपाणी आणि वर्षानुवर्षे सांड पाण्यातून होणारा प्रवास कधी संपणार असाही प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.






