कर्जत/संतोष पेरणे: कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतमधील एकसळ गावाला नळपाणी योजनेचे पाणी मिळत नाही.ग्रामस्थांना जलजीवन मिशनचे पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत आपली मागणी जोरदारपणे मांडली.ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली हद्दीतील एकसळ येथे जल जीवन योजनेअंतर्गत पाणी मिळावा अशी मागणी एकसळ गावातील ग्रामस्थांची आहे. या विषयाच्या संदर्भात ३१ ऑगस्ट रोजी सकाळी हनुमान मंदिर एकसळ येथे ग्रामसभा भरवण्यात आली होती.
जल जीवन मिशन ही भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने २०१९ मध्ये सुरू केलेली योजना असून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज शुद्ध पिण्याचे पाणी नळाद्वारे नियमितपणे उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत ‘हर घर जल’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठी पाणीपुरवठा प्रणाली तयार करणे हे प्रामुख्याने या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहेत.या ग्रामसभेमध्ये प्रामुख्याने एकसळ गावाची जल जीवन योजना कोणी चालवावी याबाबत निर्णय घेण्यात आला असून सदर योजना ही सूर्याची बोराडे हे चालवणार आहेत.
दरम्यान या वेळी महिन्याची पाणीपट्टी ठरविणे बाबत निर्णय घेण्यात आले,असून दिवसातून एक वेळा पाणी हवे असल्यास शंभर रुपये दोन वेळा पाणी हवे असल्यास दीडशे रुपये व तीन वेळा पाणी हवे असल्यास दोनशे रुपये अशी आकारणी या ग्रामसभेमध्ये करण्यात आली आहे.तसेच पाणीपुरवठ्याच्या कामासाठी कर्मचारी नियुक्त करणे बाबत निर्णय घेण्यात आला असून जलजीवन योजना राबवणाऱ्या व्यक्तीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपल्या स्तरावर करावी.
पाणीपट्टी वसुली बाबत पाणी पट्टी न भरल्यास कठोर कार्यवाही करण्यात येणार असून ६ महिने पेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या व्यक्तीचे पाणी पुरवठा समिती सदस्य पद रद्द करणे बाबत निर्णय घेण्यात आले.तसेच यापूर्वीपासून सन २००१ ते सन २०२५ पासून कोणत्या योजनेतून पाणीपुरवठा केला त्याचा हिशोब व त्या संदर्भात सर्व माहिती ग्रामपंचायतला देण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.या ग्रामसभेमध्ये गावातील ग्रामस्थांनी आपल्या अनेक समस्या ग्रामसेवक यांच्याकडे मांडल्या,त्यावेळी मोठा गदारोळ पाहायला मिळाला अनेक प्रश्न अनेक प्रतिउत्तरे पाहायला मिळाली.






