कर्जत/ संतोष पेरणे : शहरातील सर्व रस्त्यांवर आणि नेरळ तसेच कशेळे या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत असून त्यावर मात करण्यासाठी पोलीस विभागाला सर्वाधिकार असतील. त्यावेळी माझा मुलगा जरी वाहतुकीचे नियम तोडल्याचे आढळून आल्यास कारवाई करावी अशी सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी आयोजित बैठकीत केली.
मुंबई आणि पुणे यामधील मध्यवर्ती ठिकाणी वसलेले कर्जत शहर हे पर्यटन, शिक्षण आणि वास्तव्य या तिन्ही दृष्टीने झपाट्याने विकसित होत आहे. मात्र वाढत्या लोकवस्तीमुळे आणि वाहतुकीच्या बेसुमार वाढीमुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अरुंद रस्ते, खड्ड्यांनी भरलेले मार्ग, वाहतुकीसाठी अपुरी यंत्रणा आणि वाहनचालकांची बेशिस्त वृत्ती यामुळे कर्जतकरांना आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
कर्जत येथील प्रशासकीय भवनात वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी सुशांत पाटील,कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप भोसले,नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे, रायगड वाहतूक शाखेचे अधिकारी अभिजीत भुजबळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण,विभागीय परिवहन अधिकारी निलेश धोटे, तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Navi Mumbai : मनसेचा दणका अन् 24 तासाच्या आत भाजप नेत्याच्या कार्यालयाचा गुजराती फलक आता मराठीत
बैठकीच्या सुरुवातीलाच आमदार थोरवे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला आणि ही समस्या अधिक वेळ दुर्लक्षित ठेवली जाणार नाही असे निर्देश दिले.वाहतूक नियमनाची काटेकोरपणे पालन करताना माझा स्वतःचा मुलगा देखील जर वाहतुकीचे नियम मोडत असेल, तरी त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. नियम तोडणाऱ्याला गय नको. रस्त्यांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनासोबत मी स्वतः येऊन कारवाई करीन.” या वक्तव्यातून त्यांनी या प्रश्नावरचा दृढ निर्धार स्पष्ट केला.कर्जत शहरातील वाहतुकीच्या सध्याच्या स्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला.
विविध चौकांत वाहतुकीचा ताण, खड्डे, वाहतूक फलकांची अनुपस्थिती, अपुऱ्या सिग्नल यंत्रणा, वर्दळीच्या रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग आणि मुख्य रस्त्यावर वाढलेली दुकाने यामुळे निर्माण झालेला अडथळा यावर सर्व संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. सिग्नल यंत्रणा, बॅरिकेड्स, पोलीस बंदोबस्त, ट्रॅफिक जनजागृती, नियम तोडणाऱ्यांवर कारवाई आणि रस्त्यांच्या डागडुजी यांसारख्या बाबी तत्काळ हाती घेण्याचे आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी बैठकीत दिले.कर्जत चारफाटा ते श्रीराम पूल या दरम्यानच्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी पोलीस दलाने कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आमदार थोरवे यांनी व्यक्त केली. या बैठकीला शिवसेना आणि भाजप तसेच आरपीआय आठवले गटाचे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.