Representative image (Photo - Social Media)
वर्धा : निवडणूक विभागाचे आदेशानुसार जिल्ह्यातील ११ लाख ३७हजार २४२ मतदारांना मतदान प्रपत्राचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी १ लाख ७८ हजार मतदारांची नावे मॅपिंग न झाल्याने अथवा प्रपत्र भरून न दिल्याने मतदारयादीतून तात्पुरती वगळण्यात आली आहे. त्यांना नोटीस पाठवून सुनावणी घेत नावे समाविष्ट करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येईल, आवश्यक दस्तावेज सादर केल्यानंतर त्यांची नावे पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. तर ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयादी तर ४ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
निवडणूक विभागाने दिलेल्या आदेशानंतर ११ लाख ३७ हजार २४२ मतदारांची नावांची ऑनलाइन मॅपिंग करण्यात आली. त्यावेळी ९ लाखांचे वर मतदारांची नावे मैच झाली. यानंतर बीएलओने घरोघरी जाऊन भेट देत मतदारांची माहिती घेत प्रपत्र भरून घेतले.
त्यापैकी ९ लाख ५९ हजार १११ मतदारांनी माहिती देत प्रपत्र भरून बीएलओकडे सादर केले, डिजीटलायझेशनचे काम ८४.३४ टक्के पर्ण करण्यात आले आहे. १० हजार ३०३ मतदार घरी भेट देऊनही आढळून आले नाहीत. ९५ हजार ११९ मतदार स्थलांतरित झाले आहे. २४ हजार ७७३ मतदारांची नावे २ यादीत आढळून आले आहे. २५९ इतर मतदारांसह ४७ हजार ६७७ अशा १ लाख ७८ हजार १३१ मतदारांनी प्रपत्र बीएलओकडे भरून दिले नाही. यापैकी ज्या मतदारांना जिल्हयातील मतदार यादीत नाव समाविष्ट करायचे आहे. त्यांना परत एकदा संधी देण्यात येणार आहे. यानंतर अंतिम यादी प्रकाशित करण्यात आल्यानंतर किती नावे राहतात व किती वगळण्यात येतात, हे स्पष्ट होणार आहे.
वर्ध्यात 31.77 लाखांचा स्वस्त धान्य घोटाळा; निलंबनानंतर SIO आणि रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल
जिल्ह्यात एकूण १ हजार ३४२ मतदान केंद्र आहे. त्यामध्ये आर्वी विधानसभेत ३१०, देवळीत ३३५, हिंगणघाटमध्ये ३५१ व वर्धा विधानसभेत ३४६ मतदान केंद्राचा समावेश होणार आहे. त्यापैकी ११ मतदान केंद्र कमी होणार आहे.
जिल्ह्यातील चारही विधानसभेत एसआयआरचे काम करण्यासाठी १ हजार ३४२ बीएलओची नियुक्ती करण्यात आली. १७ ऑगस्टपर्यंत काम झाल्यानंतर नियुक्त बीएलओ कार्यमुक्त होण्याची वाट बघत होते. त्यांना कामातून दिलासा मिळाला आहे. ३१ ऑगस्टपासून त्यांना पुन्हा कामाला लागावे लागणार आहे. निवडणूक अधिका-यांनी बोलाविल्यानंतर त्यांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे. नोटीस पाठविणे, दस्तावेजांची तपासणी करणे व सुनावणीच्यावेळी बीएलओची मदत घ्यावी लागणार आहे.
सोमवारपासून मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत यावर दावे व हरकती नोंदविण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबरदरम्यान सुनावणी होणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
ज्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहे. त्यांना तीनवेळी नोटीस पाठवून नाव समाविष्ट करण्याची संधी देण्यात येणार आहे. यानंतर जे सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाही. त्यांची नावे कायमस्वरूपी मतदारयादीतून वगळण्यात येणार आहे.
वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. यानंतर नमुना ६ हा अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन सादर करून मतदारयादीत नव्याने नावे समाविष्ठ करण्यात येणार आहे.






