करुणा मुंडे यांची चाकणकर यांच्यावर टीका (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. हुंडा प्रकरणामुळे वैष्णवीने आपले जीवन संपवले. त्यानंतर आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राज्य महिला आयोगावर चौफेर टीका होत आहे. आता या प्रकरणात करुणा मुंडे यांनी देखील भाष्य केले आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोग आणि अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होत आहे. महिला आयोगाचा अध्यक्ष बदलावा अशी मागणी केली जात आहे. आता यावर करुणा मुंडे यांनी देखील भाष्य केले आहे.
महिला आयोगाकडे शेकडो तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारीमधील किती महिलांना आतापर्यंत न्याय देण्यात आला? असा प्रश्न करुणा मुंडे शर्मा यांनी उपस्थित केला. रुपाली चाकणकर यांचे काम पक्षासाठी फिरणे नसून, महिला आयोगाकडे ज्या तक्रारी येतेय त्याचे निवारण करणे हे आहे, असा सणसणीत टोला करुणा मुंडे शर्मा यांनी रुपाली चाकणकर यांना लगावला आहे.
महाराष्ट्रात पूजा चव्हाण, वैष्णवी प्रत्येक घरी आहेत. महिला आयोगाकडे तक्रारी करून देखील न्याय मिळालेल्या दोन महिला करुणा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असल्याचे समोर आले आहे. रुपाली चाकणकर यांनी महिलांना न्याय दिला नाही तर ३५ हजार महिलांसोबत महिला आयोगाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा करुणा मुंडे यांनी दिला आहे.
रुपाली चाकणकर या सुंदर दिसतात म्हणून त्यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.
वैष्णवी मृत्यू प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका आता संशयाच्या छायेत आली आहे. हगवणे कुटुंबाविरोधात त्यांच्या सुनांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या, पण पोलिसांनी त्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत. वैष्णवीच्या अर्भकाचे अपहरण झाल्यानंतरही पोलिसांनी दुर्लक्ष करत गंभीर निष्काळजीपणा केला. परिणामी, हगवणे कुटुंबातील काही संशयित व्यक्तींना अप्रत्यक्षपणे संरक्षण दिल्याचा आरोप पोलिसांवर ठेवला जात आहे. या पार्श्वभूमीवर, या प्रकरणात निष्क्रिय राहिलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर सरकार कोणती कारवाई करणार, हा प्रश्न आता समाजामध्ये विचारला जात आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली असून, त्यानंतर पुणे पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली. मात्र ही पत्रकार परिषद अवघ्या १ मिनिट १० सेकंदांत संपवण्यात आली, ज्यामुळे एवढ्या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात अत्यल्प माहिती दिल्याबद्दल पुणे पोलिसांवर तीव्र टीका केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. हगवणे कुटुंबीयांनी फक्त वैष्णवीचाच नव्हे, तर त्यांच्या मोठ्या सून मयुरी हगवणे हिचाही दीर्घकाळ छळ केला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये मयुरीने पौड पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असला तरी पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही.
मयुरीवरील अत्याचारांपासून ते वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पुणे पोलिसांनी गंभीर दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे वैष्णवीच्या अवघ्या नऊ महिन्यांच्या मुलाला सहा दिवस कठोर यातना सहन कराव्या लागल्या. वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे औंध रुग्णालयात असल्याची माहिती असूनही, पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले नाही.