कल्याण डोंबिवली मनपा परिसरात गेले काही दिवसांपासून नागरिक रस्त्यावरुन जाताना जीव मुठीत घेऊन जात आहे. कल्याण पूर्व पावशे नगर परिसरातील मुख्यरस्ता पुनालिंक रोड यासाठी गटार तुंबल्याने दुषित पाणी रस्त्यावर येत असून आजूबाजूच्या दुकांनाना आणि रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप होत असल्याचं दिसून येत असतानाही पालिकेचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. पुनालिंक रोड रस्त्य़ाला गटार तुंबल्याने दुषित पाणी रस्त्यावर येत होतं याचा आजूबाजूच्या दुकानांना आणि रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप होत होता. या सगळ्या समस्येबाबत नागरिकांना पालिकेकडे तक्रार दाखल केली होती. पालिकेचे कर्मचारी येऊन तात्पुरतं गटाराचं रस्त्यावरुन वाहणारं पाणी बंद केलं. मात्र खड्डा खणलेला असल्याने रस्त्य़ावर गाळ तसाच पडून आहे.
ऐन पावसाच्या दिवसात या सगळ्या समस्येमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरुन नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. इतकी गंभीर बाब असताना ही पालिकेला साधी दखल ही घ्य़ावी वाटत नाही यावरुन पालिकेच्या अधिकाऱ्यांचा हलर्जीपणा दिसून येत आहे. खणलेला खड्डा, आजूबाजूला असलेला गटाराचा गाळ आणि त्यात पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना रस्त्याने चालणं देखील कठीण होत आहे. अनेकदा तक्रार करुनही पालिकेकडून कोणतीही ठोस पाऊलं उचलली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या जवळील चेंबरमध्ये पाण्याच्या बाटल्या,प्लास्टिक आणि इतर अडकून पडल्याने पाण्याला जायला मार्ग मिळत नव्हता. नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना साफ करुन देण्यास सांगितलं होतं. सततचा कचरा अडकून पडल्याने पाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे रस्ता खणून काम करावं लागेल असं पालिकेने सांगितलं होतं. पालिकेने यानंतर खड्डा खणून तात्पुरतं पाणी रस्त्य़ावर येणार नाही असा बंदोबस्त केला होता. मात्र त्यानंतर खणलेल्या खड्ड्याचं काम अर्धवट ठेवून पालिकेने पुढे काहीच काम केलं नाही. गटाराचा गाळ आणि पाया दुषित पाण्यामुळे रोगराईचं प्रमाण देखील वाढत आहे. या सगळ्याकडे पालिकेचं दुर्लक्ष असून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत आहे.
समस्या फक्त पांडुरंग पावशेनगरच्या मुख्य रस्त्य़ाचीच नाही तर हाच रस्ता पुढे विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाला जोडतो. विठ्ठलवाडी स्मशानभूमी परिसरात कचराकुंडीतील कचरा थेट रस्तवर येतो. हीच परिस्थिती काटेमानिवली नाक्याला जाताना सारस्वत बँंकेसमोरील कचराकुंडीची आहे. या परिसरात लहान मुलांचं हॉस्पीटल आहे. त्यात भरीला भर म्हणजे रस्ता अरुंद असून त्याच ठिकाणाहून गाड्या जातात. आधीच कचरा आणि गाड्यांचं येण जाण त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंच मुश्कील झालं आहे. कल्याण डोंबिवली मनपा हद्दीमध्ये स्वच्छतेचा अभाव ठिकठिकाणी दिसून येत आहे. पालिकेला नागरिकांच्या जीवाची काळजी आहे की नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे.