मुंबई – आज भाऊबीजेच्या दिवशीही राजकीय फटाके फुटत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांना भाऊबीजेच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज पत्रकारांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आज भाऊबीजेनिमित्त शिंदे गटात जे काही ४०, ४२ जण गेले आहेत. त्यांना मी निरोगी व दीर्घायुष्य चिंतते. कधीकाळी ते आमच्यासोबत भाऊ म्हणून उभे होते. मात्र, त्यांनी जी गद्दारी, विश्वासघात केला, त्यामुळे एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात मात्र हसू आहे.
पेडणेकर म्हणाल्या, त्यांनी आमच्याशी गद्दारी केली म्हणून एका डोळ्यात आसू आहेत. तर, गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेली पाचर गेली म्हणून हसू आहे. या गद्दारांच्या जाण्यामुळे शिवसेनेत आता तरुण विचारांना वाव मिळेल. गद्दार शिवसेनेत होते, तोपर्यंत केवळ मी आणि मीच, हे त्यांचे धोरण होते. मात्र, त्यांच्या जाण्यामुळे आता पक्षातील तरुणांसमोरील अडथळा दूर झाला आहे. त्यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
राजकारणात तुमचे कोण-कोण भाऊ यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, रवी राणा माझा कधीही भाऊ नव्हता. मात्र, किरीट सोमय्या हे पूर्वीही भाऊ होते, आजही आहे. पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे ते आपले काम चोख बजावतात. त्यामुळे त्यांचेही अभिष्ठचिंतन करते.
मुख्यमंत्री शनिवारपासून नंदूरबारच्या दौऱ्यावर असून ते अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, शिंदे आता सत्तेत आहेत. त्यामुळे राज्यात झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केलीच पाहीजे. त्याचा एवढा काय ढोल वाजवताय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोरोनाची स्थिती नीट हाताळली. त्यामुळेच आज एवढे सण धुमधडाक्यात साजरे करता येत आहेत.