कोल्हापूरकरांना ऑटोरिक्षांच्या भाडेवाढीचा बसणार फटका; आता 1 मार्चपासून...(File Photo)
कोल्हापूर : जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्राकरिता कोल्हापूर व इचलकरंजी ऑटोरिक्षांसाठी रात्री 12 ते पहाटे 5 या कालावधीसाठी किमान भाडेदराच्या 25 टक्के अतिरिक्त भाडेदर लागू राहील. महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागाकरिता रात्री 11 ते सकाळी 5 या कालावधीसाठी किमान भाडेदराच्या 40 टक्के अतिरिक्त भाडेदर आकारणी केली जाईल. 1 मार्चपासून नवे भाडे दर लागू होणार असल्याने ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणिकरण करण्यासाठी 1 मार्चपासून 31 मेपर्यंत मुदत देण्यात येत आहे.
1 मार्चपासून ऑटोरिक्षांकरिता सुधारित भाडेदर लागू होत असल्याने, जे ऑटोरिक्षाधारक 1 मार्चपासून मीटर पुन:प्रमाणिकरण करुन घेतील, त्याच ऑटोरिक्षाधारकांसाठी भाडेसुधारणा लागू राहील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कोल्हापूर व इचलकरंजी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.
यावेळी विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधनदराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर तसेच समितीच्या शिफारसीच्या अनुषंगाने भाडे सुधारणेबाबत विविध रिक्षा संघटनांना वेळोवेळी अवगत करण्यात आले होते व याबाबत त्यांच्या शिफारसी भाडेसुधारणा करताना विचारात घेण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर समितीच्या शिफारसीस अनुसरुन बैठकीमध्ये जिल्ह्यातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता ऑटोरिक्षा भाडेसुधारणेबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.
अशी असेल भाडेवाढ
– किमान देय भाडे – सध्याचा भाडेदर – 22 रुपये
– सुधारित भाडेदर 25 रुपये, त्यापुढील प्रत्येक किमीसाठी देय भाडे – 18 रुपये
– सुधारित भाडेदर 23 रुपये याप्रमाणे असणार आहे.
विहित मुदतीत मीटर कॅलिब्रेशन न केल्यास…
जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुनःप्रमाणिकरण करुन घेणार नाहीत. त्यांच्यावर पुढीलप्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. विहित मुदतीत मीटर कॅलिब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी एक दिवस परवाना निलंबन मात्र किमान 7 दिवस तथापि कमाल निलंबन कालावधी 40 दिवस राहील. मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी 50 रुपये. मात्र, किमान 500 रुपये. तथापि, कमाल तडजोड शुल्क 2 हजार रुपयांपेक्षा अधिक असणार नाही.
इचलकरंजीत मीटर पद्धतच नाही
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात रिक्षाचालक मीटरने भाड्याची आकरणी करत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक फटका सहन करावा लागतो. आरटीओच्या दुर्लक्षामुळे इचलकरंजीत रिक्षाचालकांची मनमानी सुरू आहे, याला आवर घालणे गरजेचे आहे.