कुरुंदवाड : विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्याने विद्यमान आमदार सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. मंत्री पाटील यांनी कुरुंदवाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयराम पाटील माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, भाजपचे नेते व माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे (Ramchandra Dange) प्रत्येकाच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची अनुपस्थिती जाणवत होती. यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
सकाळी साडेनऊ वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार राज्याचे गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या घरी भेट दिली. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. मंत्री पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांच्या घरी भेट देण्यासाठी गेले असता तेथे भाजपचे रामदास मधाळे, दयानंद मालवेकर, अजीम गोलंदाज, उदय डांगे, सुजाता डांगे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
या भेटी दरम्यान गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंगेजखान पठाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय जयराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी आलासे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, शिरोळ तालुका शिवसेना प्रमुख वैभव उगळे, ज्येष्ठ नेते धनपाल आलासे, बाबासाहेब सावगावे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, पप्पू पाटील, सुनील गायकवाड, प्रवीण खबाले, अजित देसाई, रमेश भुजूगडे, अभिजीत पाटील, बंडू पाटील, बाबासो भबिरे, चंद्रकांत पवार, प्रवीण खबाले या मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच होणार
विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार मंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपमार्फत लवकरच उमेदवार जाहीर होण्याचे संकेत मिळत असले तरी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.