कोपरखैरणे : संपूर्ण राज्यात गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला गेला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाने शहर फटाक्यांनी, दिव्यांनी उजळुन गेले होते. वाजत, गाजत बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. भक्तांना आपला आनंद साजरा करता यावा यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. मात्र मिरवणुकांमध्ये या पोलिसांना देखील नागरिकांनी सामावून घेत आनंद साजरा करण्याची संधी दिली. कोपरखैरणे येथील एका सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकीत चक्क कोपरखैरणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी फुगडी घालत आनंद लुटला. तसेच टाळ वाजवत ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.
कोणताही सण उत्सव असो या दिवशी जग आनंद साजरा करत असताना पोलीस मात्र आनंद बाजूला ठेवत जनतेच्या सेवेत डोळ्यात तेल टाकून सेवा बजावत असतात. गणेशोत्सवात देखील अनेक पोलिसांच्या घरी गणेशोत्सव असूनही त्यांना ड्युटी बजावावी लागते. याची जाण अनेक सार्वजनिक मंडळांनी ठेवत पोलिसांना अनेक ठिकाणी आरतीचा मान देत त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. घणसोली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वारकरी पोशाखात बाप्पाची मिरवणूक काढली. भजन, कीर्तन करत मिरवणूक काढली. यावेळी बंदोबस्तात असलेल्या कोपरखैरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत सहभागी होण्यास आमंत्रित केले. भोसले यांनी देखील वारकऱ्यांसोबत फुगडी घालत आनंद साजरा केला. यावेळी बघ्यांनी टाळ्या वाजवून त्यास दाद दिली.