शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय एकत्र आला आला होता. यावेळी तरुणवर्ग हातामध्ये निळे झेंडे घेत जोरदार जयभीमचा जयघोष करीत होते. तर लाखोंचा जनसमुदाय मानवंदना व अभिवादन करण्यासाठी आलेले असताना शौर्यदिनासह मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पडला.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात उत्साहपुर्वक वातावरण प्रशासनाने गेले दोन महिने सातत्याने गाव बैठका घेत सामाजीक सलोखा निर्माण केल्याने मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांमध्ये मोठी उर्जा पाहण्यास मिळत होती. देशभरातून मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी समाज विजय स्तंभाजवळ एकवटला होता. भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लीकन सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौध्द महासंघ, दलीत पँथर यासह अनेक सामाजीक संघटनांच्या वतीने मानवंदना देण्यात येत असताना आंबेडकरी चळवळीची आणि सामाजीक विषमतेवर सडेतोड भाष्य करणारे गित याठिकाणी सादर केली जात होती.
तसेच नागरिकांना विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मुख्य रस्त्यापासुन एका रांगेत सोडण्यात येत होते. कडाक्याची थंडी असतानासुध्दा रात्रीपासुनच भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये वयस्कर, तरुणांसह महिला वर्ग व लहान मुलांची संख्या मोठी होती. दुपारच्या उन्हातही भीमसैनिक आणि नागरिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी रांगेत उभे होते. पोलीसांनी अभिवादन स्थळावर जाण्यासाठी चार बाजुंनी रांगा करुन बाहेर पडण्यासाठी पाच रांगा करुनही मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. कोरेगाव भीमा येथे रविवारी रात्रीपासुन सुरु असलेला गर्दीचा ओघ सोमवारी सकाळपासूनच वाढायला सुरुवात झाली. यावेळी तरुण कार्यकर्त्यांसह महिला, पुरुषांची लक्षणीय गर्दी झाली होती. लाखोच्या संख्येने लोक अभिवादनासाठी आल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जात आहे.
राजकीय नेत्यांकडून अभिवादन
सोमवारी दिवसभरात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, भीमराज आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार प्रकाश गजभिये, समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांसह आदींनी या ठिकाणी अभिवादन केले. प्रशासनाच्या नियोजनाने कार्यक्रम शांततेत पार पडला आहे.