फोटो - सोशल मीडिया
नाशिक : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे. मात्र केंद्रातून महाराष्ट्रासाठी कोणत्याही खास घोषणा करण्यात आलेल्या नाहीत असा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, निवडणूकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी देखील दिल्ली वारी करत भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या सर्व मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राचा अवमान ठरणारे बजेट
काल केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेमध्ये देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये आंध्र प्रदेश व बिहारसाठी योजनांचा आणि निधीचा पाऊस पडला. मात्र महाराष्ट्र केंद्राच्या निधीबाबत उपेक्षित राहिला असा सूर विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. मुंबईसारख्या अर्थिक राजधानीकडे देखील केंद्र सरकारने लक्ष दिले नाही असे देखील म्हटले जात आहे. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी देखील टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, केंद्राकडून सादर करण्यात आलेलं बजेट महाराष्ट्राचा अवमान ठरणार बजेट आहे. यामध्ये फक्त आंध्र प्रदेश आणि बिहारला पैसे दिले गेले आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला 15 हजार कोटी आले नाही. त्यामुळे केंद्रामध्ये यांची ताकद किती आणि मिंध्ये आहेत हे दिसले आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच केंद्राने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनांचा फायदा होईल की नाही माहिती नाही. सॅटेलाईट घेऊन माहिती घेता येत नाही. त्याची अंमलबजावणी होते का हे पाहणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान आवास योजना जाहीर केली पण पैसे नाहीत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
अजित पवारांची कोंडी
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या योजनांवर देखील निशाणा साधला आहे. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील जनता सुजाण आहे. हे सर्व महायुतीचे महापाप आहे. राज्यामध्ये महिला अत्याचारात वाढ झालेली आहे. तसेच हिट अँड रनची प्रकरण अद्यापही सुरू आहेत. मात्र सगळं बदलून टाकलं जातंय. योजना जाहीर करुन यांची लुटायची कामे सुरू आहे. 30 टक्के पर्यंत कमिशन वर गेले आहे. योजना सुरू करण्यासाठी हे कर्ज काढणार म्हणजे राज्य खड्ड्यात जाणार, अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच अजित पवार व आरएसएसमधील वाढत्या तणावपूर्ण वातावरणामुळे यांची कोंडी झाली आहे. आजित पवार कोणत्या दिशेला जाईल माहित नाहीत. त्यांचे तिकडे भले नाही ते डबक्यात गेले, असे मत विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.