पुण्यात बिबट्याची दहशत कायम; बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
पुणे : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर आणि शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पारगावतर्फे आळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका 8 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
रोहित काफरे (वय ८) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. रोहित हा शेतमजूर कुटुंबातील मुलगा असून, त्याचे आई-वडील शेतात कांदा न लागवडीचे काम करत होते. याचवेळी रोहित शेतालगत खेळत असताना ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. क्षणात घडलेल्या या घटनेत बिबट्याने रोहितला फरफटत नेऊन मारले.
हेदेखील वाचा : अखेर तो सापडला! पुणेकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; Airport वरील बिबट्या अखेर…
दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात बिबट्या आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातल्या काही खोट्या तर काही चर्चा खऱ्या आहेत. अशीच चर्चा खराडी परिसरातही रंगली. चक्क पोलिसांनाच फोन करून खराडी परिसरात बिबट्या दिसण्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना बिबट्या दिसला तर आम्हाला कळवा, असे म्हणत जनजागृतीही केली.
अजून किती निष्पाप बळी जाणार?
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत रोहितचा मृत्यू झाला होता. या घटनेने काफरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील बिबट्याच्या हल्ल्यांमधील ही चौथी मृत्यूची घटना असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावारण पसरले आहे. ‘अजून किती निष्पाप बळी जाणार?’ असा सवाल संतप्त ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
हेदेखील वाचा : Satara : ऊसाच्या शेतात चार पाय कापलेल्या मादी बिबट्याचा सापडला मृतदेह; 18 नखे गायब






