संग्रहित फोटो
नागपूर : प्रतापनगरमधील गणेश कॉलनी शांती निकेतन कॉलनीच्या मैदानावर दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या मैदानावर सध्या जलकुंभाचे काम महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे. या मैदानावर सध्या मोठमोठे टँकर, ट्रक येत असल्याने मैदानाची ऐशीतैशी झाली आहे. अवघ्या नऊ दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. असे असताना श्रींची स्थापना करण्यासाठी जागाच उरलेली नाही.
संपूर्ण मैदान उखडून गेले आहे. येत्या दोन दिवसात मैदानाचे सपाटीकरण महानगरपालिकेने करून द्यावे. अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल. महापालिका आयुक्तांनी त्वरीत दखल घेऊन कारवाई करावी ही विनंती केली आहे. प्रतापनगरमधील गणेश कॉलनीतील रहिवाशांनी जलकुंभासाठी जागा दिली. पण त्याच वस्तीना जलकुंभावरून पाणी मिळणार नसेल तर काय फायदा असा प्रश्न नागरिक विचारत आहे. सगळ्या भागाचे आऊटर जोडण्याचे काम सुरू आहे.
गणेश कॉलनी, शांती निकेतन कॉलनीमध्ये आजपर्यंत आऊटर का जोडण्यात आले नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. येत्या तीन दिवसात मैदान व्यवस्थित करून द्यावे. अन्यथा जलकुंभाचे काम बंद करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला.