फोटो सौजन्य - Social Media
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राजकीय रणधुमाळी उडाली आहे. सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी सत्ताधारी आमदार आणि केवळ एका ठिकाणी विरोधी आमदार असतानाही, नगरपालिकांच्या निकालांनी सत्ताधाऱ्यांची पकड ढिली असल्याचे चित्र स्पष्ट केले आहे. अकरा नगरपालिकांपैकी तब्बल पाच ठिकाणी विरोधकांनी सत्ता काबीज करत सत्ताधारी गटाला जोरदार धक्का दिला आहे. या निकालांमुळे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, भाजप आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांना राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसला आहे.
रविवारी (दि. २१) जाहीर झालेल्या निकालांमध्ये सर्वच नगरपालिकांतील लढती अटीतटीच्या ठरल्या. विशेषतः बुलढाणा नगरपालिकेची निवडणूक ‘हाय व्होल्टेज’ मानली जात होती. हा मतदारसंघ सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांचा असला, तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उबाठा शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके, आमदार धीरज लिंगाडे आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचीही हीच ‘होमपिच’ असल्याने प्रतिष्ठेची लढत रंगली होती. मात्र, आमदार गायकवाड यांनी योग्य राजकीय समीकरणे जुळवत नगराध्यक्षपदासह २२ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली.
चिखली नगरपालिकेत भाजप आमदार श्वेता महाले आणि काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली. येथे भाजपने बाजी मारत आपला किल्ला शाबूत ठेवला. खामगाव नगरपालिकेत कामगार मंत्री फुंडकर यांनी एकहाती नेतृत्व करत भाजप व समर्थित २९ नगरसेवक निवडून आणले, विरोधकांना धूळ चारली. जळगाव जामोद आणि शेगाव या नगरपालिकांमध्ये आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासाठी संमिश्र निकाल लागला. जळगाव जामोद येथे भाजपने सत्ता राखली, तर शेगावमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपचा पराभव केला.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मेहकर आणि लोणार हे बालेकिल्ले मानले जात असले, तरी येथेच मोठे उलटसुलट घडले. मेहकरमध्ये उबाठा शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी पुन्हा करिश्मा दाखवला, तर लोणारमध्ये काँग्रेसने विजय मिळवत केंद्रीय मंत्र्यांना मोठा धक्का दिला. सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना शिंदे गटाच्या आघाड्यांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. सिंदखेड राजात नगरविकास आघाडीने विजय मिळवला, तर देऊळगाव राजात अजित पवार गटाने सत्ता राखली. आमदार चैनसुख संचेती यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मलकापूर आणि नांदुरा नगरपालिकांमध्येही संमिश्र चित्र दिसले. मलकापूरमध्ये काँग्रेसने अचूक रणनिती आखत सत्ता मिळवली, तर नांदुरामध्ये भाजपने आपला गड शाबूत ठेवला. एकंदरीत, या निकालांनी जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले असून, सत्ताधाऱ्यांना इशारा आणि विरोधकांना नवे बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.






