BJP
अकलुज : भारतीय जनता पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा झाली आणि सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्त्यांकडून विरोधाची प्रचंड मोठी त्सुनामी आली. ‘जे एक लाखाचे लीड देऊ शकतात, ते एक लाखाने मायनस मतदान करु शकतात’, अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया आता कार्यकर्ते उघडपणे व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी सहज वाटणारा विजयाला कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक ब्रेक लावणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील चार तालुके येतात तर सातारा जिल्ह्यातील दोन तालुके असलेल्या सातारा जिल्ह्याला संधी मिळाल्यानंतर यावेळी सोलापूर जिल्ह्यातील उमेदवाराला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती आणि त्यातही इच्छुक उमेदवारांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू असलेल्या मोहिते-पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते-पाटील असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसहीत मोहिते-पाटील समर्थकांमध्ये होती.
गेली ४० ते ५० वर्षे समाजकारणाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचे नेतृत्व करत असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाने आपल्या कार्यकर्त्यांशी नाळ कधी तुटू दिली नाही. सातत्याने संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. त्यामुळे त्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहाखातर भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र झोकून पक्षवाढीसाठी झटणाऱ्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवण्याची सहमती दर्शवून तब्बल दोन ते तीन वेळा अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे. असे असतानाही पक्षाकडून उमेदवारीसाठी डावलले गेल्याने कार्यकर्ते प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मोहिते-पाटील समर्थकांनी सर्व यंत्रणा सज्ज करून ठेवली असून, ‘तुम्ही फक्त निर्णय घ्या’, ‘तुम्ही फक्त आदेश द्या…ही निवडणूक कोणाही नेत्याविरुध्द किंवा पक्षाविरुध्द लढायची नसून आपल्या आत्मसन्मानासाठी लढायची असल्याच्या भावना कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहे. त्यामुळे एकंदरीत आता माढा लोकसभा नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांनीच हातात घेतली असून, त्यांच्या भावनांचा आदर राखून मोहिते-पाटील काय निर्णय येतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.