विरोधकांच्या हाती मुद्दे देऊ नका; फडणवीसांचा वाचाळवीर आमदारांना थेट इशारा
Maharashtra Assembly Session 2025: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (03 जुलै) तिसरा दिवस आहे. गेल्या दिवसांत हिंदी भाषा सक्तीकरणाचा निर्णय आणि शेतकऱ्यांच्या मुद्दयावरून विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीला चांगलेच धारेवर धरलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील सर्व वाचाळवीर आमदारांना ताकीद दिली आहे.
महायुतीत वाद होतील, असे कोणतेही वक्तव्य करू नका, एखादे वादग्रस्त वक्तव्य करून पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका अशी, सक्त ताकीद मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बुधवारी (02 जुलै) महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आली होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सर्व आमदारांचे कानही टोचले.
60,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर Tata Punch खरेदी केली तर किती असेल EMI?
गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील आमदारांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. एकमेकांवर विविध मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या सगळ्या प्रकारावर फडणवीस यांनी महायुतीत वाद होतील, अशी वक्तव्ये टाळा,अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही डिनर डिप्लोमसी झाल्याचे बोलले जात आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व आमदारांनी सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहावे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्रिय राहावे, आपल्या मतदारसंघात जनतेशी संपर्कात राहून कार्य करावे, तसेच सोशल मीडियावर प्रभावीपणे उपस्थित राहावे, अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी अधिवेशनाचा चौथा दिवस असून आतापर्यंत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फारशी कोंडी करू शकलेली नाही. मात्र, पुढील दिवसांत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी महायुती समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, शंभुराज देसाई, उदय सामंत, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीत ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असून, त्या मेळाव्याची पोलखोल करण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे.