जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी कारवाई ; जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं
जम्मू-काश्मीर किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांनी जोरदार कारवाई सुरू केली असून चतरूच्या कुछल भागात भीषण चकमक सुरु आहे. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान २ ते ३ दहशतवाद्यांना घेरण्यात यश आले असून, परिसरात जोरदार गोळीबार सुरू आहे.
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. सुरक्षा दलांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि त्याला प्रत्युत्तर देताना चकमक सुरु झाली. जम्मूस्थित व्हाईट नाईट कॉर्प्सने सांगितले की, ऑपरेशन अजूनही सुरू असून अतिरेक्यांना पकडण्यासाठी घेराबंदी अधिक घट्ट केली जात आहे.
पीटीआयच्या अहवालानुसार, जैश-ए-मोहम्मदशी संबंधित अतिरेकी या भागात लपल्याची खात्री आहे. परिसरात अतिरिक्त लष्कर दल तैनात करण्यात आले असून, एकाही दहशतवाद्याला पळून जाण्याची संधी देण्यात येणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवांवर नियंत्रण आणले असून, शाळा-कॉलेजांना तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, आज सकाळी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्री अमरनाथ यात्रेच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून यात्रेची औपचारिक सुरुवात केली. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा अतिरिक्त बडगा उचलण्यात आला आहे.
९ एप्रिल रोजी याच परिसरात झालेल्या ऑपरेशनमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार करण्यात आले होते आणि त्यांच्या ताब्यातून एके आणि एम४ रायफल्ससह मोठा शस्त्रसाठा हस्तगत झाला होता. त्यामुळे हे भाग सातत्याने दहशतवाद्यांचे गुप्त ठिकाण असल्याचे स्पष्ट होते.
Parliament Attack Case: संसद हल्ल्यातील दोन आरोपींना जामीन मंजूर; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
गेल्या काही महिन्यांत काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींमध्ये वाढ झाल्याचे सुरक्षा यंत्रणांचे निरीक्षण आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी घातपाताचा प्रयत्न करू शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याने सुरक्षा यंत्रणा कमालीची सतर्क झालेली आहे.